Maharashtra CNG Shortage : सीएनजीचा तुटवडा; उस्मानाबाद, सोलापूर, पुणे ग्रामीण भागात वाहनधारकांचे हाल
CNG : एकीकडे पेट्रोल, डिझेलप्रमाणे सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे तर दुसरीकडे सीएनजीचा तुडवडा निर्माण झाल्यानं वाहनधारकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. उस्मानाबाद, सोलापूर, पुणे ग्रामीण या जिल्ह्यातील सीएनजी पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई-हैदरबाद महामार्गावर सीएनजी पंप असल्याने चालकांची धावपळ उडत असल्याचे पहायला मिळत आहे. लोक सीएनजी पंपावर वाट पाहात चक्क झोपा काढत असल्याचे उस्मानाबाद जिल्ह्यातील चित्र आहे.
पेट्रोल, डिझेलप्रमाणे सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील 15 दिवसांमध्ये पुण्यामध्ये सीएनजीच्या किलोच्या दरात तब्बल 11 रूपयांनी वाढ झाली आहे. सीएनजीच्या किलोच्या दरात एकीकडे वाढ झाली असताना दुसरीकडे मात्र सीएनजीचा तुटवडा देखील जाणवत आहे. पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. सीएनजी मिळत नसल्या कारणाने अनेक वाहन चालकांवर वाहन बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
मागील काही दिवसांपासून सीएनजी गॅसवर गॅसचा पुरवठा सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गॅस अभावी अनेक पंप बंद असल्याचं चित्र आहेत. ज्या पंपावर गॅस उपलब्ध होत आहे. तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. बर्याच वेळा रांगेत थांबूनही गॅस संपल्यावर वाहन चालकांना गॅसविनाच वाहन घरी आणावे लागत आहे. रिक्षा चालकांना गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक रिक्षा चालकांवर रिक्षा बंद ठेवण्याची वेळ येत असल्याचे रिक्षा चालक सांगत आहेत.