Kalyan Dombivli : कल्याण, भिवंडी लोकसभेवरुन भाजप, शिंदे गटात वाद होणार?
आगामी लोकसभा निवडणूक जसजशी अधिकाधिक जवळ येत चालली आहे, तसतसे कल्याण, आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतले मतभेद अधिकाधिक स्पष्ट होऊ लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवलीचे विद्यमान खासदार आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी खासदार शिंदे यांचं नाव न घेता बोचरी टीका केली आहे. ज्यांनी गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेत बळ मिळवलं त्यांना त्यांच्या नजरेनं सर्व विदूष असल्याचा भास होतो, असे उद्गार आमदार गायकवाड यांनी काढले. तीन राज्यांमधला भाजपचा विजय आमदार गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला. त्यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण आणि भिवंडी या दोन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून येणार, असं सांगून गायकवाडांनी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केलं होते. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आमदार गायकवाडांचं हे विधान मनोरंजनापुरतं आणि प्रसिद्धीसाठी असल्याचं वक्तव्य केलं होतं.