Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांना दिलासा; वादग्रस्त वक्तव्य प्रकरणातील खटला रद्द
शिर्डी : पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. अशातच इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंदुरीकर महाराजांविरोधातील खटला रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराजांच्या वतीने संगमनेर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात अपील करण्यात आलं होतं. हे अपील न्यायालयानं मंजूर केलं आहे. संगमनेर दिवाणी न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात इंदुरीकर महाराजांनी अपील केलं होतं. याप्रकरणी इंदुरीकर महाराजांच्या वतीनं निकाल देण्यात आला आहे.
प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी पुत्र प्राप्तीविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22 अंतर्गत संगमनेरच्या न्यायालात केस दाखल झाली होती. त्यावरील कोर्टाचे कामकाज पूर्ण झाले आहे. कोर्टाने इंदोकीकर महाराजांना 7 ऑगस्ट रोजी कोर्टासमोर उपस्थित होण्यास सांगीतले होते. न्यायालयाने आज इंदुरीकरांच रिव्हीजन अपील मंजुर करत खालच्या कोर्टाची प्रोसेस इश्यु ऑर्डर रद्द केली आहे.
इंदुरीकर महाराजांच्या समर्थकांनी न्यायालयाच्या निकालानंतर पेढे वाटले आहेत. तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने यावर आणखी कडक भूमिका घेत, आपण या निकालाला आव्हान देण्यासाठी हायकोर्टात जाणार असल्याचं म्हटलं आहे.