(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Election Commission on Shivsena Symbol : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, आयोगाची भूमिका काय?
महाराष्ट्राच्या राजकारणातली ऐतिहासिक आणि सर्वात मोठी बातमी.बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचं शिवसेना हे नाव आणि त्यांनी निवडलेलं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं या ऐतिहासिक निर्णयाची आज घोषणा केली. त्यामुळं मूळ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. यापुढच्या काळात शिवसेना या अधिकृत नावाचा पक्ष आता ठाकरेंचा नाही तर शिंदेंचा असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे समर्थकांनी राज्यभर जल्लोष केला. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी मातोश्री बोलावलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर कठोर शब्दात टीका केली. निवडणूक आयोगानं आज शेण खाल्लं या तिखट शब्दात ठाकरेंनी टीका केली. शिवाय कागदी धनुष्यबाण जरी त्यांच्याकडे असला तरी बाळासाहेबांच्या पूजेतला धनुष्यबाण माझ्याकडे असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं ठाकरेंनी सांगितलं. त्याला उत्तर देताना २०१९ मध्ये ज्यांच्याकडे धनुष्यबाण गहाण ठेवलं होतं त्यांच्याकडून तो आपण सोडवून आणला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.