Maharashtra Government Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदे फडणवीस यांच्यात चर्चा?
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर पडलाय. मुख्यमंत्री शिंदे आजारी असल्यानं डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत पोहचलेत. सुप्रीम कोर्टात सुरु असलेला शिवसेनेतील सत्तासंघर्षाचा तिढा अजूनही कायम आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराचा आजचा मुहूर्तही हुकला आहे. सोमवारी कोर्टात सुनावणी होणार असल्यानं आता त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समर्थक ५० आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत समर्थक आमदारांच्या मतदारसंघातील कामांबाबत चर्चा होणार आहे. तर तिकडे दिल्लीत गेलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटीही महत्वाच्या आहेत. सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि मंत्रिमंडळ विस्तार याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठीच हा दिल्ली दौरा असल्याचं कळतंय.