Chandrapur Tiger : चार राज्य पार, 2 हजार किलोमीटरचा प्रवास..ब्रम्हपुरी 21 वाघ चंद्रपुरातून थेट ओरीसामध्ये
चंद्रपूर जिल्ह्यातील एका वाघाने ४ राज्यातील जंगलं पार करत ओरिसा राज्यात आपला अधिवास निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. केंद्र सरकारच्या वाइल्ड लाईफ इन्स्टिटयूट ऑफ इंडिया या संस्थेने या घटनेला दुजोरा दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील हा वाघ असून ब्रम्हपुरी ट्वेन्टी वन असं या २ हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या वाघाचं नाव आहे. आपल्या राज्यातील एखादा वाघ ओरिसा राज्यात स्थलांतर करून गेल्याची ही पहिलीच घटना आहे. ओरिसा राज्यातील गजपती भागात काही दिवसांपूर्वी एका वाघाने गाईची शिकार केली होती. या भागात वाघ नसल्याने वनविभागाने कॅमेरा ट्रॅप लावून या वाघाचा शोध घेतला. मात्र कॅमेरात आलेला वाघ हा अनोळखी असल्याने त्याची ओळख पटविण्यासाठी त्याचा फोटो वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कडे पाठविण्यात आला. अंगावर असलेल्या पट्ट्यावरून हा वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी ट्वेन्टी वन असल्याची पुष्टी कऱण्यात आली. विशेष म्हणजे २०२१ च्या व्याघ्रगणनेत हा वाघ सिंदेवाही तालुक्यात असल्याची नोंद कऱण्यात आली होती. साधारण ४ वर्षांचा हा नर वाघ अधिवास आणि जोडीदाराच्या शोधात ओरिसा राज्यात गेला असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र या वाघाने आपल्या राज्यातून छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि ओरिसा असा ४ राज्यांचा प्रवास अनेक अडथळे पार करत पूर्ण केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. २ हजार किलोमीटरच्या या प्रवासामुळे वाघांच्या स्थलांतर आणि भ्रमण मार्गावर नव्याने प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील वाघाचं स्थलांतर, ब्रम्हपुरी २१ वाघ महाराष्ट्रातून ओडिशामध्ये दाखल, आतापर्यंत वाघाचा २ हजार किलोमीटरचा प्रवास.