(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrapur Remdesivir Blackmarketing : रेमडेसिवीरच्या काळाबाजार प्रकरणी चक्क डॉक्टरलाच अटक
चंद्रपूर शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार प्रकरणी एक डॉक्टर आणि दोन नर्ससह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील क्राईस्ट रुग्णालयातील ICU चे डॉक्टर जावेद सिद्दीकी आणि या डॉक्टरला मदत करणाऱ्या दोन नर्सेसचा समावेश आहे. विशेष म्हणजे क्राईस्ट रुग्णालयाला चंद्रपूर शहरातील मुख्य शासकीय कोविड रुग्णालया एवढेच महत्व आहे. चंद्रपुरातील अन्न व औषध प्रशासनाला रेमडेसिव्हरचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती मिळावी होती. त्याआधारे शुक्रवारी दुपारी चंद्रपूर शहरातील गांधी चौक परिसरातून अन्न व औषध प्रशासनाने घातलेल्या धाडीत एका युवकाला अटक करण्यात आली. या युवकाकडून दोन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले होते. यासोबतच इंजेक्शन खरेदी करणाऱ्या प्रदीप गणवीर यालाही अटक करुन चंद्रपूरच्या शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या आरोपींकडून हे इंजेक्शन नक्की कुठून आणले गेले याबाबत चौकशी केली असता क्राईस्ट रुग्णालयाच्या डॉ.सिद्दीकी आणि या दोन नर्सची नावं निष्पन्न झाली. काळ्याबाजारात या इंजेक्शनची किंमत 50,000 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा सुरु असलेला काळाबाजार समोर येण्याची शक्यता आहे.