Walmik Karad Police Custody : कराड गजाआड! पोलीस कोठडीनंतर वाल्मिकच्या वकिलांची मोठी प्रतिक्रिया
बीड : वाल्मिक कराड यांना पवनऊर्जा क्षेत्रातील कंपनी अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीनं केज कोर्टात हजर केलं. वाल्मिक कराड आज सकाळी सीआयडीसमोर शरण आले. अवादाचे प्रकल्प अधिकारी सुनिल शिंदे यांनी 2 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरुन वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केज न्यायालयाच्या न्यायाधीश बाविस्कर यांच्या समोर सुनावणी सुरु झाली. सीआयडीकडून जे. बी. शिंदे यांनी बाजू मांडली. तर, वाल्मिक कराड यांचे वकील अशोक कवडे यांनी युक्तिवाद केला.
कोर्टात काय काय घडलं?
वाल्मिक कराड यांचे वकील अशोक कवडे कोर्टात दाखल झाले. सरकारी वकील एस. एस. देशपांडे दाखल झाले होते. मात्र, सीआयडीचे वकील म्हणून जे.बी. शिंदे यांनी युक्तिवाद केला. सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील देखील कोर्टात दाखल झाले होते.
न्यायाधीशांनी वाल्मिक कराड यांना पोलीस विरोधात तक्रार आहे का ?असं विचारलं, यावर वाल्मिक कराड यांनी नाही असं उत्तर दिलं. सरकारी वकील जे.बी. शिंदे यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून वाल्मिक कराड विरोधात तक्रार दाखल असल्याचं कोर्टासमोर मांडलं. या अनुषंगाने हत्या आणि अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल आहेत. म्हणून तपास करण्यासाठी कस्टडी हवी आहे, असं म्हणत शिंदे यांनी सीआयडीच्या वतीनं 15 दिवसांची कोठडी न्यायालयाकडे मागितली.