Raj Thackeray Vidarbha Tour : राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, विधानसभेसाठी मनसेनं कसली कंबर
Raj Thackeray, विदर्भ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेसाठी 'मिशन विदर्भ'साठी रणनीती आखत आहेत. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. 27 तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्हाचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे. तर 28 तारखेला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर जिल्हाचा आढावा घेतला जाईल.
राज ठाकरे लवकरच अमरावती दौऱ्यावर जाणार
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी 7 उमेदवार जाहीर केले आहेत. आता मनसे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे. 27 तारखेला सकाळी 7.30 वाजता राज ठाकरे यांच अमरावतीत रेल्वे स्टेशनवर आगमन होताच मनसे कार्यकर्ते करणार जोरदार स्वागत करणार आहेत. यावेळीच राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातील नेत्यांची यादी जाहीर करतील असे बोलले जात आहे.
राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेचे 7 उमेदवार
1. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे - पंढरपूर
3. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
5. चंद्रपूर - मनदीप रोडे
6. राजुरा - सचिन भोयर
7. वणी - राजू उंबरकर
लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा, विधानसभा स्वबळावर?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग, मुंबई आणि पुणे अशा 4 सभा घेतल्या होत्या. या सभांमधून त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, राज ठाकरेंनी सभा घेतल्या तेथील काही उमेदवारांचा निवडणुकीत विजय झाला. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुसंडी मारली. महाविकास आघाडी आणि त्यांच्या विचारांच्या महाराष्ट्रात 31 जागा निवडून आल्या. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेल्या राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी मराठवाडा, सोलापूर आणि विदर्भाचा दौराही केला होता.