SSR Suicide Case | सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण अद्याप सीबीआयकडे गेलेलं नाही : गृहमंत्री अनिल देशमुख
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एडीआर संदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दावा केला आहे की, हे प्रकरण सीबीआयकडे अद्याप ट्रान्सफर झालेलं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्यावेळी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. तेव्हा मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अॅक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दाखल केला होता. म्हणजेच, मुंबई पोलिसांच्या मते, अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू हा आत्महत्या केल्यामुळेच झाला असून यात संशयास्पद कोणतीच बाब नाही.
गृहमंत्री सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्याच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, ''सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आद्यार सीबीआयकडे गेलेलं नाही. प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. 11 तारखेला यासंदर्भात निकाल येईल. मुंबई पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरु आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास कोणतंही कारण नाही'