(Source: ECI/ABP News/ABP Majha)
EXCLUSIVE | Arjun Rampal | छाप्यादरम्यान एनसीबीने कुत्र्याची औषधं जप्त केली : अर्जुन रामपाल
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनच्या तपासादरम्यान एनसीबीच्या मुंबई युनिटने अभिनेता अर्जुन रामपालच्या घरात छापा टाकला होता. आता एनसीबीच्या या छाप्याबाबत अर्जुन रामपालने मोठा दावा केला आहे. या छाप्यादरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कुत्र्याची वेदनाशामक औषधं आणि बिहिणीची एन्झायटीची औषधं जप्त केली होती, असं अर्जुन रामपालने सांगितलं आहे. एनसीबी अनेक महिन्यापासून बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाचा तपास करत आहे. या दरम्यान अर्जुन रामपालवर एनसीबीची नजर गेली. यामुळे अर्जुन रामपालची दोन वेळा एनसीबीच्या कार्यालयात चौकशीही झाली.
एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, "अर्जुन रामपालने सांगितलं की त्याच्या घरात ज्या दोन प्रकारच्या गोळ्या सापडल्या आहेत, त्यापैकी एक गोळी कुत्र्याची असून जी वेटनरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली होती. तर दुसरी गोळी बहिणीची आहे. दिल्लीतील एका मानसोपचारतज्ज्ञांनी तिच्या एन्झायटीबाबत ही गोळी दिली होती."
"ज्या संशयाच्या आधारे मला चौकशीसाठी बोलवलं होतं तो संशयच बिनबुडाचा आहे," असंही अर्जुन रामपालने आपल्या जबाबात म्हटलं.