Rutuja Latke Gets Relief : ऋतुजा लटके यांना कोर्टाचा दिलासा Andheri East Bypolls
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. शुक्रवारी सकाळी 11 पर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाच्या या निर्णयाने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीने सुनावणी झाली. यावेळी ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, ऋतुजा लटके यांनी राजीनामा 2 सप्टेंबर रोजी दिला. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी राजीनामा फेटाळण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. आम्ही नियमांनुसार मुंबई महापालिकेकडे राजीनामा सुपूर्द केला. एक महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करायचा नसेल तर एक महिन्यांचा पगार द्यावा लागेल असे सांगण्यात आले. एक महिन्याचा पगार कोषागरात जमा केला असल्याचे लटके यांच्या वकिलाने सांगितले.