(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Psycho Killer : रमण राघव, बियर मॅन नंतर मुंबईत आणखी एका सायको किलरची दहशत, पोलिसांकडून अटक
रमण राघव, बियर मॅन या सायको किलरनी मुंबईत दहशत निर्माण केली होती, आता आणखी एका सायको किलरच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी आवळल्यात. मुंबईतल्या रस्त्यावरुन फिरुन दोघांची हत्या करणाऱ्या सायको किलरला पोलिसांनी अटक केलीय. शनिवारी अवघ्या 15 मिनिटात मुंबईच्या भायखळा आणि जे.जे.मार्ग परिसरात फुटपाथवर झोपलेल्या दोघांच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. सुरेश शंकर गौडा असं या आरोपीचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे या हत्या सहज म्हणून केल्याचं आरोपीनं सांगितलंय. 2015 सालीही गौडाला हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. मात्र 2016 साली पुराव्याअभावी त्याची सुटका करण्यात आली होती. या आरोपीच्या अटकेनंतर मुंबईत फूटपाथवर झालेल्या सर्व हत्येच्या घटना पोलीस पडताळणार आहेत. आरोपी गौडाने अशा अनेक हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.