विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीची नवी खेळी, खुल्या मतदानाचा प्रस्ताव
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज घेण्याची वेळ उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आहे. भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास निवडणूक होणार नाही. त्यामुळे भाजप अर्ज मागे घेणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडी नवी खेळी करण्याच्या तयारीत आहे. गुप्त मतदानाने होणारी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्याची महाविकास आघाडीची रणनीती असल्याची माहिती मिळत आहे. तसा प्रस्ताव आधी विधानसभेत मांडला जाण्याची शक्यता आहे. तो प्रस्ताव मंजूर करुन, मग अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्याची तयारी सत्ताधाऱ्यांकडून सुरु असल्याचं समोर येत आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रस्ताव सादर केला जाईल.
बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीनं घेतली जाणार. अशी महाविकास आघाडीची रणनिती असल्याचं समजतंय. महाविकास आघाडीकडून नाना पटोले यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरलाय. तर भाजपकडून किसन कथोरे उमेदवार आहेत. त्यामुळे उद्याच्या अध्यक्ष निवडीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज घेण्याची वेळ उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आहे. भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास निवडणूक होणार नाही. पण जर निवडणूक झाली तर ती खुल्या पद्धतीने व्हावी, यासाठी महाविकासघडीने रणनीती आखली आहे.
महाविकास आघाडी बहुमत चाचणीत पास
आज महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी आज पार पडली. या चाचणीत महाविकास आघाडीला 169 सदस्यांनी मतदान केलं तर विरोधात शून्य सदस्यांनी मतदान केलं. तर चार सदस्य तटस्थ राहिले. या बहुमताच्या चाचणीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार आणि इतर अपक्ष मिळून यांचं संख्याबळ 170 च्या जवळ होतं, त्यातली 169 मतं महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पडली. आता विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यामुळे लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.