Kirti Fatak In Pune : शिंदे गटाच्या मंचावर जाणाऱ्या जयदेव ठाकरे अन् स्मिता ठाकरे यांना आतेबहीण किर्ती फाटक यांनी फटकारलं; म्हणाल्या...
बाळासाहेब ठाकरे हयात असताना स्मिता ठाकरे कॉंग्रेसमध्ये जायला निघाल्या होत्या तर जयदेव ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरेंना नेहमी मनस्तापच दिला, असा आरोप उद्धव आणि जयदेव ठाकरेंच्या आतेबहीण किर्ती फाटक यांनी केला.
Kirti Fatak In Pune : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हयात असताना स्मिता ठाकरे कॉंग्रेसमध्ये जायला निघाल्या होत्या तर जयदेव ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरेंना नेहमी मनस्तापच दिला, असा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray आणि जयदेव ठाकरेंच्या (Jaydev Thackeray) आतेबहीण असलेल्या किर्ती फाटक यांनी केला आहे. एबीपी माझासोबत बोलताना त्यांनी स्मिता ठाकरे (Smita Thackeray) आणि जयदेव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे मोठे बंधु जयदेव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी स्मिता ठाकरे उपस्थित राहिल्याने उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. उद्धव आणि जयदेव ठाकरेंच्या आतेबहीण असलेल्या किर्ती फाटक यांनी या वादात उद्धव ठाकरेंची बाजू घेतली आहे. कुटुंबातील कलहाचा अशाप्रकारे राजकारणासाठी वापर होणं दुर्देवी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
'स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरे अनेकदा कुटुंबियांना दुखावलंय'
सध्याचं सुरु असलेलं राजकारण दुर्वैवी आहे. आमच्या कुटुंबियांना हे राजकारण बघाताना त्रास होत आहे. यापूर्वीही अशा प्रकारचं चित्र आपण बघितलं आहे. स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे पहिल्यांदाच असं वागलेले नाहीत. मात्र सध्याची परिस्थितीला गद्दारांचा गट हे उत्तम नाव दिलं आहे. ठाकरे कुटुंबीय आमच्या गटातही आहेत, हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. ठाकरे कुटुंबीयच आम्हाला पाठिंबा देत आहेत, हे त्यांना दाखवायचं आहे, असा आरोप त्यांनी शिंदे गटावर केला आहे.
'तेव्हा कॉंग्रेसचे गुणगाण गायले'
स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरे या दोघांबद्दल अनेक आक्षेप आहेत. 2009 मध्ये स्मिता ठाकरे यांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. तसं त्यांनी उघडपणे सांगितलं होतं आणि माध्यमांना मुलाखती देखील दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांंधीचे गोडवे गायले होते. शिवाय कॉंग्रेसचे विचार त्यांनी काम करण्याची पद्धत किती चांगली आहे?, हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. हेच विचार देश पुढे नेऊ शकतात, अशा मोठ्या गप्पा मारल्या होत्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना कॉंग्रेसचे गोडवे गाणाऱ्या व्यक्तीचा मंचावर बोलवून सन्मान करत आहात हा दुटप्पीपणा आहे. हा तुमचा दुटप्पीपणा नेते आणि महाराष्ट्राची जनता बघत आहे आणि मतपेटीत जनता या दुटप्पीपणाचं नक्की उत्तर देतील, असाही आरोप किर्ती फाटक यांनी स्मिता ठाकरे आणि शिंदे गटावर केला आहे.
तुम्ही फक्त नौटंकी करत आहात?-किर्ती फाटक
जयदेव ठाकरेंचा आम्ही आदर करतो. त्यांच्यात चांगले गुण आहेत शिवाय हुशार व्यक्ती आहे. मात्र काही वर्षांपूर्वी याच जयदेव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंबाबत अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. माध्यमांना सोबत घेत त्यांनी हे आक्षेप नोंदवले होते, हे शिंदे कदाचित विसरले आहेत. बाळासाहेबांचे विचार घेत पुढे जात आहोत असं सगळ्या महाराष्ट्राला सांगत आहेत. त्याच बाळासाहेबांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्याचा मंचावर सत्कार करत आहात हीच तुमची बाळासाहेबांबद्दलची श्रद्धा किंवा भक्ती आहे का? की तुम्ही फक्त नौटंकी करत आहात?,असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.