Zero Hour : महायुती की मविआ मित्रपक्षांचा सन्मान करणार? ते हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी?
नमस्कार, मी विजय साळवी झीरो अवरमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येतो की काय? अशी चर्चा आज दिवसभर झाली. त्याचं कारण, दोन व्हॉट्सअप स्टेटस. आता हे दोन्ही व्हॉट्सअप स्टेटस कोणाचे आहेत? आणि त्यातून कोणता राजकीय भूकंप होऊ शकतो आणि महायुतीला मोठा धक्का बसू शकतो. हे सगळं आपण आजच्या भागात पाहणार आहोत. आणि त्या दोन्ही व्हॉट्सअप स्टेटसचं विश्लेषणही करणार आहोत. पण, सुरुवात विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटप आणि संघर्षाच्या बातमीनं...
मंडळी, हे आहे... महाराष्ट्र जागावाटपाचं आजचं चित्र... आता थोडं फ्लॅशबॅक सांगतो... महाराष्ट्र विधानसभेत २०१९ साली अपक्षांशिवाय १२५ पक्षांचे उमेदवार रिंगणात होते.. त्यापैकी १०२ पक्षांचे उमेदवार हे केवळ एक अंकी होते.. त्यामुळं एका मतदारसंघापुरताच पक्ष असूनही त्याचाही परिणाम निकालावर झाला. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं पुराण आम्ही आज का सांगतोय. तर त्याचं कारण आहे...महाराष्ट्रात २०१९ आणि २०२२ साली झालेले राजकीय भूकंप... आणि त्यानंतर तयार झालेल्या अनपेक्षित आघाड्या...
आज आपण एक गोष्ट स्पष्टपणे सांगू शकतो.. ती म्हणजे... महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी.. असाच सामना होणार आहे.. या दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच आणि मॅरेथॉन बैठका सुुुरु आहेत. पण याच बैठकांमध्ये टेन्शन वाढवू शकतात. ते आहेत छोटे मित्रपक्ष.
आता हेच पाहाना. महाविकास आघाडी सत्तेत होती.. तेव्हा अनेक छोटे पक्ष त्यांच्यासोबत होते.. मग महायुती सत्तेत आली... तर अनेक छोट्या पक्षांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय केला. पण आता विधानसभा निवडणुकीची वेळ आलीय, तेव्हा बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष महायुतीतून बाहेर पडला. त्यांच्याशिवाय महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट), आरपीआय आठवले गट, जनसुराज्य शक्ती पक्ष, जनप्रहार पक्षानं आपापल्या पद्धतीनं जागांची मागणी केलीय.
तिकडे महाविकास आघाडीतही टिकून राहिलेल्या छोट्या मित्रपक्षांनी जागांची मागणी करायला सुरुवात केलीय. त्यातली काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आधी पाहूयात..