(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
'माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके....' असं मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे.
मुंबई : मराठी भाषेला मोठा इतिहास आहे, तब्बल 2 हजार वर्षांच्या इतिहासाची साक्ष माय मराठी (Marathi) देते, म्हणूनच माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी गेल्या 10 वर्षांपासूनचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013 सालापासून प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी, त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली होती. आता, केंद्रीय कॅबिनेटमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने 13 कोटी मराठीजनांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र, मराठी भाषेला (Marathi Language) अभिजात दर्जा मिळाल्याने नेमका काय बदल होणार, काय फायदा होणार हे जाणून घेऊया. मराठी भाषेचा विकास, ग्रंथ साहित्य आणि संशोधनासाठी याचा फायदा होणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषा गौरवली जाणार आहे.
'माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके....' असं मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे. मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचं सांगितलं जातंय. असं असलं तरी अद्याप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. त्यामुळे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावी, अशी मागणी कोट्यवधि मराठी बांधवांकडून व राजकीय नेत्यांकडून करण्यात येत होती. अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला आहे.
Classical Language Status: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?
1) अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2) अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं.
3) प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
4) भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं शक्य होणार
5) मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत
अभिजात दर्जा मिळवणारी मराठी भाषा 7 वी
सध्या देशातील तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर, अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी आपली मराठी भाषा ही आता देशातील 7 वी भाषा ठरली आहे. सन 2004 मध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली. तामिळनंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू, 2013 मध्ये मल्याळम, 2014 मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. आता, विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.