Zero Hour Full | धनंजय देशमुख कुटुंबाचं आंदोलन, मनोज जरांगेंचा सरकारला सवाल ABP Majha
वाल्मिक कराडची पुण्यात कोट्यवधींची संपत्ती
सध्या चांदा ते बांदा आणि गल्ली ते दिल्ली गाजत असलेलं प्रकरण म्हणजे बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या. या हत्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नसला तरी सर्वपक्षीयांच्या रडारवर आहे तो वाल्मिक कराड. या वाल्मिक कराडने आणि त्याच्या टोळीने वेगवेगळ्या शहरांत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होत आहे. पुण्यात मोक्याच्या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजच्या समोर वाल्मिक कराडनं 25 कोटी रुपये मोजून ऑफिस प्रीमायसेस विकत घेतल्याचं बोललं जातंय. याच आर्थिक व्यवहाराच्या तपासासाठी ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धनंजय देशमुखांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 35 दिवस उलटूनही कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे. शिवाय खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी न केल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं दिसून आलं. हत्या झालेल्या संतोष देशमुखांचे लहान भाऊ धनंजय देशमुखांनी पोलिसांना चकवा देत, थेट पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन केलं.
दोन तास विनवणी केल्यानंतर अखेर धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरले. टाकीवरुन खाली उतरल्यानंतर धनंजय देशमुखांनी पोलिसांकडून तपासासंदर्भात कोणतीच माहिती दिली जात नसल्याचा आरोप केला. यावेळी ग्रामस्थांनी सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी मंगळवारी दहा वाजेपर्यंतचा अल्टीमेटम दिला. मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला.
कुणालाही सोडू नका, मुख्यमंत्र्यांचे आदेश
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला आहे. एकही आरोपी सुटता कामा नये अशा सूचना त्यांनी तपास यंत्रणांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत आणि एसआयटी प्रमुखांना फोन करुन तपासात कुणालाही दयामाया दाखवू नका असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणांना दिले आहेत.