(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zero Hour : मुख्यमंत्रीपदावरुन शरद पवार यांचं वक्तव्य... अजित पवार म्हणतात, धादांत खोटं!
Sharad Pawar and Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जुलै 2023 मध्ये भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांत जास्त जागा येऊनही शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला नाही. नाहीतर 2004 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता, अस आरोप अजित पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल आणि मंत्री छगन भुजबळ यांनी देखील केला आहे. दरम्यान, आज मुंबई येथील बैठकीत अजित पवारांनी शरद पवार खोटं बोलत असल्याचं म्हणत आक्रमक भाषण केलं. 2004 मध्ये महाराष्ट्रात काय घडलं? कोणाच्या किती जागा आल्या जाणून घेऊयात...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या
सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा काढल्यानंतर शरद पवारांची 1999 मध्ये काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर शरद पवारांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर हे देखील राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते. दरम्यान, शरद पवारांनी नवा पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांच्या पदारात यशही पडू लागलं होतं. शरद पवार पक्षातून बाहेर पडले, मात्र त्यानंतरही त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार दिला नाही 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील ,आर.आर. पाटील अशी दिग्गज नेते मंडळी शरद पवारांसोबत होती. राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी जोरदार प्रचार केला आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या 71 जागा निवडून आणल्या. तर काँग्रेस पक्षाच्या 69 जागा निवडून आल्या. त्यामुळे सर्वाधिक जागा निवडून आल्याने शरद पवार मुख्यमंत्रिपद आपल्याकडे खेचून घेतील, असंही बोलले गेलं. मात्र, तसं काही घडलं नाही. राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळूनही मुख्यमंत्रिपदाची माळ विलासराव देशमुख यांच्या गळ्यात पडली. शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद सोडलं. मात्र, राज्याच्या मंत्रिमंडळातील इतर महत्वाची खाती आपल्याकडे खेचून घेतली. त्यानंतर आजवर सातत्याने शरद पवारांना मुख्यमंत्रिपद का सोडलं? याबाबत सवाल विचारण्यात आले आहेत.