(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Special Report | अडीच ग्रॅम सोन्याचा न्याय झाला पण तब्बल 22 वर्षांनी
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका विवाहितेचे चाळिशीत चोरीला गेलेले मंगळसूत्र साठीनंतर परत मिळाले आहे. या साठी या महिलेने तब्बल 22 वर्षे पाठपुरावा केला. शंकुतलाबाईंनी ऊस तोडणी करून 900 रुपयांचे अडिच ग्रॅम सोने खरेदी केले होते. पोलिसांनी चोरट्याकडून पकडलेले सोने परत घेण्यासाठी वकिलांना 500 रूपये द्यावे लागले. कित्येक फेऱ्या पोलिस स्टेशनच्या आणि न्यायायलयाच्या कराव्या लागल्या आहेत.
उस्मानाबादची शंकुतला बाई येरमाळ्याच्या यात्रेसाठी 1998 साली गेल्या होत्या. तेव्हा चोरीला गेलेले 2 ग्रॅम 500 मिली सोने 2 मार्च 2021 ला परत मिळाले. सोने चोरीला गेले तेव्हा शंकुतला बाई 40 वर्षीच्या होता आज 63 वर्षाच्या आहेत.
कळंब तालुक्यातील वाकरवाडी येथील शकुंतला विठ्ठल शिंदे या शेतकरी महिला आहेत. 1998 साली चोरी झाली तेव्हा येरमाळ्यात पोलिस चौकी होती. आज सुसज्ज पोलिस स्टेशन आहे. तत्कालीन कर्मचाऱ्यांनी वर्षभरातच गुन्ह्याचा छडा लावला होता. मंगळसूत्रासह चोरट्यांना गजाआडही केले. पुढे पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. मात्र तारखा अन सुनावण्या या न्यायालयीन प्रक्रियेतच हे मंगळसूत्र अडकून पडले. चोरट्याला अद्याप शिक्षा झालेली नाही. न्यायालयीन प्रक्रियेत दीर्घकाळ हे सोने नाहक अडकून बसले होते. पोलिसांनी 1998 साली झालेल्या चोरीचा तपास 2010 साली लागला होता.