Saat Barachya Batmya : 7/12 : एकरी मिळतं 4 लाखांचं उत्पन्न, कोकणातील भातशेतीला कणगर कंदपिकाचा आधार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गावाची 'कणगरचं गाव' अशी ओळख आहे. इथले शेतकरी भातशेती सोबत कणगर या कंदपिकाचीही शेती करतात. कणगर ला पांढरी रताळी असंही म्हणतात. वेतोरे गावात ५० हेक्टरवर कणगरची लागवड केली जाते. एप्रिल ते जून या कालावधीत शेतकरी कणगरची लागवड करतात. जमिनीत कंद पुरून त्या कंदाना कोंब आला की त्या वेलींना आधार म्हणुन खुंट पुरले जातात. पाच ते सहा महिन्यांत कणगरपासून चांगलं उत्पन्न मिळतं असं शेतकरी सांगतात. खर्च वजा जाता एकरी ४ लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळू शकतं असं वेतोरे शेतकरी सुशांत नाईक सांगतात. पचनास हलकं असल्यामुळे उपवासाच्या दिवशी कणगर उकडून खाल्लं जातं. एका कणगरचे वजन अंदाजे १०० ते १५०ग्रॅम असतं. हे उकडून किंवा चुलीतील राखेत भाजून खातात. आजारातून उठलेल्या व्यक्तीस ताकद येण्यासाठी हा कंद देण्याची प्रथा कोकणात आहे. वेल पूर्ण सुकल्यावर वेल कापून काढून कणगर गोळा करून ठेवले जातात. कंद खोदून काढून त्यातील एखादं दोन पुढील बी म्हणून ठेवले जातात. उरलेले स्वच्छ धुऊन हवेशीर जागी ठेवून बाजारपेठेत विक्रीसाठी नेली जातात. या कंदांना बटाटय़ासारखे मोड येत नाहीत. त्यांना सुप्तावस्था असते ती किमान ४ ते ५ महिने तरी टिकते. सिंधुदुर्गच्या स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर कणगरला मागणी असते तसंच लगतच्या गोवा राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गोवा राज्यातून व्यापारी वेतोरे गावात येऊन कणगरची खरेदी करतात.