Anjali Damania On Majha Katta : माझा कट्टा : धनंजय मुंडे प्रकरणाचा 'दी एंड' काय? दमनियांचा दावा
भ्रष्टाचाराविरोधात अनेक नेत्यांच्याविरोधात लढले, पण एकनाथ खडसेंच्या विरोधात लढताना खूप त्रास झाला. आपला मोबाईल नंबर ट्रेनमध्ये लिहिला आणि त्यावरून रोज असंख्य फोन यायचे. त्यानंतर बीपीचा त्रास सुरू झाल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितलं. आता माझं काही झालं तरी चालेल, माझ्या जीवाचं काहीही होवो पण मी लढायचं सोडणार नाही असंही त्या म्हणाल्या. अंजली दमानिया एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात संवाद साधत होत्या.
खडसे प्रकरणात खूप त्रास झाला
अंजली दमानिया म्हणाल्या की, मी आतापर्यंत छगन भुजबळ, अजित पवार, नितीन गडकरी, नवाब मलिक अशा अनेकांच्या विरोधात लढले. त्यावेळी एवढा त्रास झाला नव्हता. पण एकनाथ खडसेंच्या विरोधात लढताना खूप त्रास झाला. खडसेंनी अतिशय वाईट पद्धतीने त्रास दिला. माझं नाव आणि नंबर ट्रेनमध्ये लावण्यात आलं. 'खट्टी मिठी बाते करणे के लिए ये नंबर पे कॉल करो' असं लिहून माझा नंबर देण्यात आला. भुसावळवरून जाणाऱ्या ट्रेनमध्येच हे लिहिलेलं असायचं. त्यावरून रोज असंख्य कॉल यायचे. प्रत्येकाशी बोलताना खूप राग यायचा.
जीवे मारण्याची धमकी
खडसे प्रकरणात लढा सुरू असताना एका रात्री एक फोन आला आणि आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. खडसेंच्या विरोधात लढणे बंद कर नाहीतर तुझ्या कुटुंबाला सोडणार नाही अशी धमकी आली. त्याच्यानंतर आपल्याला बीपीचा त्रास सुरू झाला असल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं.
आता माझं काही झालं तरी चालेल, माझ्या जीवाचं काहीही होवो पण मी लढायचं सोडणार नाही. मला तीनवेळा सुरक्षा देण्याचा प्रस्ताव आला, पण मी तो नाकारला. कारण एखाद्याला मारायचं असेल तर तो मारणारच असं अंजली दमानिया म्हणाल्या.
अंजली दमानियांचा बोलवता धनी कोण?
अंजली दमानिया यांचा बोलवता धनी कुणीतरी आहे असा आरोप सातत्याने केला जातो. त्यावर बोलताना दमानिया म्हणाल्या की, "खडसेंविरोधात आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला पुरावे दिल्याचा आरोप केला गेला. तर अजित पवारांच्या विरोधात आरोप केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्याला पुरावे दिल्याचा आरोप केला. पण देवेंद्र फडणवीस असो वा पृथ्वीराज चव्हाण, त्यांना पेपर्स आणि पुरावे हे आपण दिले आहेत. एखादा व्यक्ती कोणताही स्वार्थ न ठेवता असं काम करू शकतो यावर राजकीय नेत्यांचा विश्वासच नाही. त्यामुळे आपला बोलवता धनी कुणीही नाही.
अनेकांकडून कौतुक, लढण्याची प्रेरणा
आपण काम करत असताना आपल्या कामाचे कौतुक अनेकजण करत असल्याचं अंजली दमानियांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, "रोज असंख्य मेसेजेस येतात. पनवेलला एका ठिकाणी गेल्यानंतर सर्वसामान्य महिलांनी सांगितलं की मी जे काही बोलतेय ते त्याच बोलतात असं त्यांना वाटतंय. तुम्ही जर लढला नाही तर कुणीच लढणार नाही. कारण विरोधी पक्षच लढायला उरला नाही असं काही अधिकारी म्हणतात. काही न्यायाधीश त्यांच्या ऑर्डरमध्ये दमानियांनी काही चांगलं केलं असा उल्लेख करतात, त्यावेळी चांगलं वाटतं. लोकांना वाटतंय की आपण जे काही करतोय ते योग्य करतोय."
All Shows

































