Majha Katta With Pralhad Pai : सद्गुरु वामनराव पै यांचे सुपुत्र प्रल्हाद पै यांच्यासोबत माझा कट्टा
मुंबई: मन आपल्या स्वाधीन नाही, तर आपण मनाच्या अधीन आहोत, त्याच्यामागे फरफटत जात आहोत. त्यामुळेच आज सगळीकडे नकारात्मकता आहे. हे बदलायचं असेल तर मनावर ताबा मिळवायला हवा, मन जर आपल्या हाती आलं तर मनाच्या सामर्थ्यानं आपण सर्वकाही मिळवू शकतो असं प्रल्हाद पै म्हणाले. जीवनविद्या मिशनचे प्रमुख आणि सदगुरू वामनराव पै यांचे सुपुत्र असलेले प्रल्हाद पै एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात आले होते.
जगभरातील लक्ष्यावधींच्या आयुष्यात बदल घडवणारे अध्यात्म गुरू अशी प्रल्हाद पै यांची ओळख आहे. वामनराव पै यांचं निधन झाल्यावर जीवनविद्या मिशनची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. कोरोनाच्या काळात त्यांनी चांगलं काम केलं.
प्रल्हाद पै म्हणाले की, "आज सगळीकडे दु:ख, नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे सकारात्मकता गरजेची आहे. पण एका दिवसात ते शक्य नाही. विचारांचं शास्त्र जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत विचारांची गंभीरता लक्षात येत नाही. सदगुरुंनी या सगळ्या मागचं विचार शास्त्र मांडलं. आम्ही तुम्हाला काही सोडायला सांगत नाही, फक्त मन धरायला सांगतो. मन आपल्या स्वाधीन नाही, आपण मनाच्या अधीन आहोत. त्यामागे फरफटत जात आहोत. मनाला आपल्या स्वाधीन करणे हे आपल्याला समजलं पाहिजे. मन जर आपल्या हाती आलं तर मनाच्या सामर्थ्यानं आपण सर्वकाही मिळवू शकतो. सर्वकाही देण्याची ताकत ही मनामध्ये आहे. अध्यात्म म्हणजे केवळ भजन नव्हे तर मनाला अधीन करणे होयं."
मनाचं सामर्थ्य काय असतं यावर बोलताना प्रल्हाद पै म्हणाले की, "मनाचं शास्त्र म्हणजे मनाचं सामर्थ्य. हे सगळं आपल्यामध्ये आहे. आतापर्यंत ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या आपल्या विचारामुळे घडल्या. आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम हे विचार करत असतात. सर्व काही निर्माण करण्याची ताकत आपल्याकडे असते. त्याचं माध्यम म्हणजे मन होय. मनामध्ये जो काही आपण विचार करु ते साकार करण्याचं सामर्थ्य असतं."