(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, देशात लवकरच 6 G युग अवतरणार
देशात लवकरच 6 जी युग अवतरणार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केली आहे.
India Mobile Congress 2023: देशात लवकरच 6 जी युग अवतरणार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केली आहे. देश 6 जी मध्येही लीडर होण्याची दिशेने वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. देशात 5 जीचा प्रसार वेगाने होत आहे. 5 जी लाँच झाल्यावर वर्षभरात 4 लाख बेसस्टेशन्स निर्माण करण्यात आली असल्याचे मोदी म्हणाले. इंडिया मोबाईल एक्झिबिशनमध्ये बोलताना पंतप्रधानांनी 6 जी चे सुतोवाच केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम, प्रगती मैदान इथं 7 व्या भारतीय मोबाइल काँग्रेस-2023 चे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी टूजी स्पेक्ट्रमचे नाव घेऊनही खरपूस समाचार घेतला. तसेच पीएम मोदींनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भविष्यातील प्रगतीकडे लोकांचे लक्ष वेधले. यावेळी पंतप्रधान मोदींनी शैक्षणिक संस्थांना 100 5G वापराच्या केस लॅब दिल्या. या लॅबद्वारे ड्रोन 5G आणि 6G तंत्रज्ञानाच्या विकासात मदत करतील. या प्रयोगशाळांच्या माध्यमातून स्वावलंबी भारताची प्रगती साधली जाईल. तसेच, भारताचे डिजिटल परिवर्तन सोपे होईल.
भावी पिढी तंत्रज्ञान उद्योगाचे नेतृत्व करेल
तंत्रज्ञानाच्या विकासामुळे भविष्यात पूर्ण होणाऱ्या गोष्टी लवकर पूर्ण होऊ शकतात. येणारा काळ पूर्णपणे वेगळा असेल असे पंतप्रधान मोदी म्हणाले. देशाची भावी पिढी तंत्रज्ञान उद्योगाचे नेतृत्व करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. देशात 5G तंत्रज्ञान जगाच्या तुलनेत वेगाने आणले गेले आहे, तरीही आम्ही थांबलो नसल्याचे पंतप्रधान म्हणाले. .
सेमीकंडक्टरसाठी 8000 कोटी रुपयांची PLI योजना सुरू
देशातील सेमीकंडक्टर चिप्सची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारनं 8000 कोटी रुपयांची PLI योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये जागतिक कंपन्या भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने सेमीकंडक्टर चिप्स बनवत आहेत. भारत नेटने 2 लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबँडने जोडले आहे. 75 लाख गरीब मुलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जोडले. आमचे तरुण कोणत्याही क्षेत्राशी जितके जोडले जातील, तितका अधिक फायदा होईल.
सायबर सुरक्षेसाठी पायाभूत सुविधा सज्ज असायला हव्यात
देशात सायबर सुरक्षेसाठी काम केले जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. G20 बैठकीत जगासाठी सायबर सुरक्षेवर चर्चा झाली, ज्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सुरक्षित ठेवण्यावर चर्चा झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. समाजाला सुरक्षित करण्यासाठी, तंत्रज्ञान देखील सुरक्षित करावे लागेल. भारतातील तरुण हे विचारांचे नेते आहेत, ज्यांना जग फॉलो करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. तंत्रज्ञानातही आपल्याला विचारांचे नेते बनले पाहिजे. यासाठी त्यांनी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या सदस्यांना काम करण्याची प्रेरणा दिली.
महत्त्वाच्या बातम्या: