Kolhapur Circuit Bench: लोकराजा राजर्षी शाहूंचा समतेचा नारा बुलंद करणारी करवीरनगरी सर्किट बेंचच्या स्वागताला सजली, 42 वर्षांच्या लोकलढ्याचं स्वप्न सत्यात उतरलं, सरन्यायाधीशांच्या हस्ते लोकार्पण
Kolhapur Circuit Bench: कोल्हापूर सर्किट बेंचच्या लोकार्पणसाठी अवघी करवीरनगरी सज्ज झाली आहे. सीपीआरसमोरील जुन्या कौटुंबिक न्यायालयामध्ये सर्किट बेंचचं कामकाज होणार आहे

Inauguration of Kolhapur Circuit Bench by Chief Justice Bhushan Gavai: गेल्या तब्बल साडेचार दशकांपासून ज्या दिवसाची वाट पाहिली, अहोरात्र संघर्ष केला, प्रसंगी तुरुंगात गेले, केसेस अंगावर घेतल्या, वकिलांनी सुद्धा अंगावर केसेस घेतल्या, पण संघर्षाची तलवार म्यान केली नाही. तो संघर्ष सुरु होता मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी. त्याच कोल्हापूर खंडपीठासाठी पहिला लढा कोल्हापूरकरांनी जिंकला असून आज (17 ऑगस्ट) कोल्हापूरकरांसाठी सोनियाचा दिनु उगवला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण आज देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या विद्यमान नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा खंडपीठासोबत आता कोल्हापूरचे सर्किट बेंच न्यायव्यवस्थेत नवे स्थान घेणार आहे. सरन्यायाधीश शनिवारीच कार्यक्रमासाठी करवीनगरीत दाखल झाले असून त्यांचे विमानतळापासून ऐतिहासिक ताराराणी चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सर्किट बेंचच्या लोकार्पणसाठी अवघी करवीरनगरी सज्ज
कोल्हापूर सर्किट बेंचच्या लोकार्पणसाठी अवघी करवीरनगरी सज्ज झाली आहे. सीपीआरसमोरील जुन्या कौटुंबिक न्यायालयामध्ये सर्किट बेंचचं कामकाज होणार आहे. या इमारतीने गेल्या काही दिवसांपासून कात टाकली असून संपूर्ण परिसराचे नूतनीकरण करण्यात आलं आहे. याच ठिकाणी उद्यापासूनच (18 ऑगस्ट) कोल्हापूर सर्किट बेंच कामकाजाला प्रारंभ होणार आहे. यासाठी प्रशासकीय स्टाफ आणि न्यायमूर्तींची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. या इमारतीच्या परिसरामध्ये असणाऱ्या क्रांती उद्यानासह संपूर्ण परिसर चकाचक झाला आहे. कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सर्वांसाठी खुला असून मुख्य कार्यक्रम मेरी वेदर ग्राउंडवर होणार आहे. सरन्यायाधीश भूषण गवई कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण करतील. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, लोकप्रतिनिधी तसेच सहा जिल्ह्यातील पक्षकारांसह अवघी जनता स्वागतासाठी सज्ज आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून हा कार्यक्रम दिमाखदार आणि अविस्मरणीय होण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अहोरात्र काम सुरू आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर स्वच्छता करण्यात आली आहे. न्यायालयीन इमारतीचा परिसर नो हाॅकर्स, नो पार्किंग करण्यात आला आहे.
सर्किट बेंचसाठी शेंडा पार्कात जागा प्रस्तावित
दरम्यान, सर्किट बेंचसाठी 9 हेक्टर 18 आर जागा शेंडा पार्कमध्ये प्रस्तावित करण्यात आली आहे. या जागेसाठी शासनाची मान्यता मिळण्यासाठी कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई कोल्हापूरमध्ये पोहोचताच दिली. दीडशे वर्षांपूर्वी 1874 मध्ये बांधलेल्या आणि कौटुंबिक न्यायालयासाठी वापरात असलेल्या इमारतीची माहिती सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली. राधाबाई इमारतीमध्ये ग्रंथालय, नोंदणी विभाग व व्हिडीओ कॉन्फरन्स रुमचे कामकाज होणार आहे.
सहा जिल्ह्यांना लाभ होणार
या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे. यापूर्वी या जिल्ह्यांतील नागरिकांना आपली प्रकरणे मुंबईत नेऊन लढावी लागत होती, ज्यासाठी वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा खर्च होत होता. आता ही प्रकरणे कोल्हापुरातच चालवली जाणार असल्याने सर्वांसाठी मोठी सोय होणार आहे. सोलापूर वगळता इतर जिल्ह्यांना तीन-चार तासांत कोल्हापूर गाठता येते, सोलापूरलाही साधारण पाच तासांचा प्रवास करून कोल्हापुरात पोहोचता येईल. बेंच सुरू झाल्यामुळे न्यायाच्या दारी सर्वसामान्य माणसाला सहज पोहोचता येईल, न्यायासाठी होणारा खर्च आणि वेळ कमी होईल, आणि न्यायदानाची गती वाढेल. हे सर्किट बेंच केवळ न्यायदानाची नवी सुविधा नाही, तर न्याय विकेंद्रीकरणाचा आणि न्याय सुलभतेचा भक्कम पाया आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सातत्याने याबाबत सुतोवाच केले आहेत. त्यामुळे कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी न्यायदानाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























