Cyberbullying : सायबर बुलिंग मुलांसाठी धोकादायक; युनिसेफने शेअर केल्या 'या' 10 टिप्स
Cyberbullying : मुलांसाठी सायबर धमकी देणे धोकादायक आहे, युनिसेफने संरक्षणासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत.
Cyberbullying : आजच्या काळात सोशल मीडियाच्या (Social Media) वाढत्या वापरामुळे सायबर बुलिंगसारखे (Cyberbullying) प्रमाण वाढत चाललं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज करून, गेमिंग प्लॅटफॉर्मवरून आणि फोनच्या माध्यमातून अगदी सर्रासपणे सायबर धमकी दिली जाऊ शकते. मुलांना घाबरवणं, त्यांना घाबरवणं आणि लाजवणं हा सायबर बुलिंग मागचा मुख्य उद्देश असतो. या सायबर बुलिंगला बळी पडलेल्या मुलांना राग, दु:ख, भीती अशा विविध प्रकारच्या नकारात्मक भावनांचा अनुभव येऊ शकतो.
इंटरनेटचं जाळं जितक्या वेगाने वाढत चाललं आहे. तितक्याच वेगाने त्याचे तोटे आणि नुकसानही वाढत चाललं आहे. आतापर्यंत तुम्ही सोशल मीडिया ॲप्सवर ट्रोल झाल्याचे ऐकले असेल. ज्यामध्ये लोक कोणत्याही कमेंट किंवा पोस्टवर आपला राग काढतात आणि समोरच्या व्यक्तीला मानसिक त्रास देतात.
पण, सायबर बुलिंग हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच हानिकारक ठरतंय. सायबर बुलिंगमध्ये डिजीटल टेक्नॉलॉजीचा वापर करून एखाद्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. धमकावलं जातं. काही असभ्य वर्तन, आक्षेपार्ह मेसेज, कमेंट्स तसेच फोटो आणि व्हिडीओ पाठवून धमकावण्याचा प्रयत्न केला जातो. अशा परिस्थितीत युनिसेफने सायबर बुलिंग टाळण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत.
सायबर बुलिंग टाळण्यासाठी युनिसेफच्या टिप्स
1. मजबूत पासवर्ड वापरा : तुमच्या सर्व ऑनलाईन अकाऊंटसाठी मजबूत पासवर्ड वापरा.
2. वैयक्तिक माहिती लिमिटेड करा : तुमची वैयक्तिक माहिती सार्वजनिकपणे ऑनलाइन शेअर करणे टाळा, जसे की तुमचे पूर्ण नाव, पत्ता किंवा फोन नंबर.
3. विचारपूर्वक पोस्ट करा : ऑनलाइन काहीही पोस्ट करण्यापूर्वी, त्याचा इतरांवर कसा परिणाम होईल याचा विचार करा.
4. सायबर धमकी ओळखा : जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला सायबर धमकीचा सामना करावा लागत आहे, तर ते ओळखा आणि सामोरे जाण्यासाठी पावले उचला.
5. सायबर धमकीच्या विरोधात उभे रहा : जर तुम्हाला सायबर धमकी दिसली तर गप्प बसू नका. याविरोधात आवाज उठवा.
6. पुरावे गोळा करा : तुम्हाला सायबर धमकीचा सामना करावा लागत असल्यास, पुरावे गोळा करणे महत्त्वाचे आहे. स्क्रीनशॉट, ईमेल आणि मेसेज सेव्ह करून ठेवा.
7. विश्वासू व्यक्तीशी बोला : जर तुम्हाला सायबर बुलिंगचा अनुभव येत असेल, तर विश्वासू प्रौढ व्यक्तीशी बोला.
8. सायबर धमकीबद्दल इतरांना जागृत करा : सायबर धमकीबद्दल तुमचे मित्र, कुटुंब यांना कल्पना द्या. त्यांना जागृत करा.
9. सायबर धमकीची तक्रार करा : जर तुम्हाला सायबर धमकीचा सामना करावा लागत असेल, तर त्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांना करा.
10. सायबर धमकीला घाबरू नका : तुम्ही एकटे नाही आहात हे लक्षात ठेवा. सायबर धमकीला घाबरू नका आणि त्याविरुद्ध उभे राहण्यासाठी आवाज उठवा.