शेख हसीना यांना पंतप्रधानपदावरुन पायउतार का व्हावं लागलं? नेमकं कारण काय? बांगलादेशात दोन महिन्यांत काय घडलं?
शेख हसीना यांनी बंगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी देश सोडला आहे. त्या भारतात आश्रय घेण्याची शक्यता आहे.
ढाका : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी अचानकपणे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधानपदावरून दूर होताच त्यांनी बांगलादेशमधून काढता पाय घेतला आहे. त्यांनी बांग्लादेश सोडला असून एका हेलिकॉप्टरने त्यांनी भारताच्या दिशेने उड्डाण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेख हसीना आश्रय घेण्यासाठी भारतात येऊ शकतात. दरम्यान, शेख हसीना यांना अचानकपणे राजीनामा का द्यावा लागला? बांगलादेशमध्ये नेमकं काय घडतंय? असे विचारले जात आहे.
300 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
गेल्या काही दिवासांपासून बांगलादेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासाळली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून या देशात विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या लोकांमध्ये रोष आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून या देशात अस्थिरतचेचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ केली जात आहे. आंदोलन करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात जवळपास 300 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच या देशातील कायदा आणि सुव्यवस्था आणखी बिघडली आहे.
विरोधकांचा दबाव, आंदोलक आक्रमक
एकीकडे हे आंदोलन चिघळलेले असताना दुसरीकडे देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान शेख हसीना यांच्यापुढे होते. विशेष म्हणजे विरोधकांकडूनही त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली जात होती. दरम्यान, आंदोलकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
इंटरनेट बंद, अनेक ठिकाणी कर्फ्यू
आंदोलकांना थोपवण्यासाठी शेख हसीना यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले. ठिकठिकाणी इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली. तसेच काही भागात कर्फ्यू लावण्यात आला होता. सरकारने सध्या बांगलादेशमध्ये तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली होती. तरीदेखील हसीना यांच्या सरकारला आंदोलकांना थोपवण्यात तसेच त्यांचे समाधान करण्यात यश आले नाही. शेवटी त्यांना आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्या त्यांनी बांग्लादेश सोडला असून त्या भारतात आश्रय घेण्याची शक्यता आहे.
हिंसाचार का? शेख हसीना यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण काय?
बांगलादेशात आरक्षणाच्या धोरणावरून सध्या वाद चालू आहे. सध्याच्या आरक्षणाच्या धोरणाला बांगलादेशात विरोध केला जात आहे. याच विरोधकाला घेऊन सध्या बांगलादेशात हिंसाचार उफाळला आहे. बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1972 साली बांगलादेश सरकारने स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्यांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांत 30 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. आरक्षणाचे हेच धोरण आजही लागू आहे. या धोरणाला सध्या बांगलादेशमध्ये विरोध केला जात आहे. सध्या चालू असलेला हिंसाचार जून महिन्याच्या शेवटी चालू झाला. सुरुवातीला आक्षणाविरोधातील लढा हिंसक नव्हता. 15 जुलै रोजी ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे पोलीस तसेच सत्ताधारी आवामी लीगचा पाठिंबा असलेल्या विद्यार्थी संघटनेत हिंसाचार झाला. या घटनेत कमीत कमी 100 जण जखमी झाले. त्यानंतरच आरक्षणाला विरोध करणाऱ्या या लढ्याला बळ मिळाले.
18 जुलैपासून हिंसाचार उफाळला, अन् बांगलादेशात अस्थितरता
पुढे 18 जुलै रोजी या आंदोलनादरम्यान कमीत कमी 19 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर 19 जुलै रोजी आणखी 67 मारले गेले. या आंदोलनादरम्यान आतापर्यंत 300 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हीच संधी साधत विरोधी बाकावरील पक्षाने सत्ताधारी शेख हसीना यांच्यावर टीका चालू केली. शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जाऊ लागली. परिस्थिती जास्तच चिघळल्यावर शेख हसीना यांच्या निवासस्थानावरही आंदोलक चालून आले. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
बांगलादेशचे लष्करप्रमुख काय म्हणाले?
बांगलादेश लष्करप्रमुख वकार-उर-झमान यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, शेख हसीन यांनी राजीनामा दिला आहे. अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. सर्वांनी संयमी राहावे. आम्ही अंतरिम सरकार स्थापन करणार आहोत. सर्वांनी शांतता राखावी. हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही. प्रत्येक हत्या आणि इतर गुन्हेगारी प्रकरणांचा गांभीर्याने विचार केला जाईल. सर्व पक्षांचे नेते एकत्रितपणे आले होते आणि चांगली गोष्ट घडली आहे. सर्वपक्षीय बैठकीत अवामी लीगचे कोणीही नव्हतं. पंतप्रधानांनी राजीनामा दिला असून लवकरच अंतरिम सरकार स्थापन करणार आहोत. आम्ही अध्यक्षांशी बोलू. तुम्ही हिंसाचार करणार नाही,आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा :