(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup : ना कॅप्टन, ना कोच, ना निवड समितीचा प्रमुख, न्यूझीलंडचा टी-20 वर्ल्ड कपसाठी संघ नेमका कुणी जाहीर केला? पाहा व्हिडीओ
T20 World Cup : आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर झाला आहे. न्यूझीलंडचं नेतृत्त्व केन विलियमन्सन करणार असून त्याचा हा सहावा टी-20 वर्ल्ड कप असेल.
नवी दिल्ली : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) न्यूझीलंडच्या (New Zealand) संघाची घोषणा करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या संघाच्या कॅप्टनपदाची जबाबदारी केन विलियम्सनवर देण्यात आली आहे. न्यूझीलंडचा आयसीसी टी-20 वर्ल्डकपसाठी संघ जाहीर करण्यात आला असून 1 जूनपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या बऱ्याच खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे.
न्यूझीलंडच्या संघाची घोषणा ऑकलंडमध्ये करण्यात आली. न्यूझीलंडच्या निवड समितीचे प्रमुख सॅम वेल्स यांनी संघातील सदस्यांची निवड केली आहे. ही निवड एएनझेड सेंटर ऑकलंडमध्ये जाहीर करण्यात आली. न्यूझीलंडनं पुन्हा एकदा नेतृत्त्वाची संधी केन विलियमन्सनला दिली आहे.
केन विलियमन्सनं सहाव्यांदा टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार आहे. तर, टीम साऊथी सातव्यांदा टी-20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार आहे. टीम साऊथीच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट आहेत. विलियमन्सन आणि साऊथीशिवाय ट्रेंट बोल्टला देखील संघात संधी देण्यात आली आहे.
न्यूझीलंडच्या 15 सदस्यीय संघात 13 खेळाडू असे आहेत ज्यांनी 2022 मध्ये वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. न्यूझीलंडच्या संघातील बेन सीअर्स आणि राचिन रवींद्र असे दोन खेळाडू आहेत, ज्यांचा हा पहिला वर्ल्ड कप असेल.
Join special guests Matilda and Angus at the squad announcement for the upcoming @t20worldcup in the West Indies and USA. #T20WorldCup pic.twitter.com/6lZbAsFlD5
— BLACKCAPS (@BLACKCAPS) April 29, 2024
न्यूझीलंडचा संघ
केन विलियमन्सन (कॅप्टन), फिन अलेन, ट्रेंट बोल्ट, मिशेलब्रेसवेल, मार्क चॅम्पमन, डिवोन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिम्मी नीशम, ग्लेन फिलिप्स, राचिन रवींद्र, मिशेल सँटनर, इश सोधी, टीम साऊथी आणि बेन सीअर्स (राखीव)
न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टेड यांनी टी-20 वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा करणं आनंदाचा क्षण असल्याचं म्हटलं. टी-20 वर्ल्डकपसाठी निवड झालेल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जागतिक स्पर्धेत आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करणं हा विशेष क्षण असल्याचं स्टेड यांनी म्हटलं. हेन्री आणि राचिन रवींद्र पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली आहे.
न्यूझीलंडच्या संघाची घोषणा कुणी केली?
आयसीसीच्या नियमानुसार टी-20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या संघांना त्यांच्या टीम 1 मेपूर्वी जाहीर करायच्या आहेत. न्यूझीलंडनं संघ जाहीर करुन यामध्ये आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडच्या संघाची घोषणा मतिल्दा आणि अंगस या विद्यार्थ्यांनी केली. न्यूझीलंडच्य टीमची घोषणा होत असताना मंचावर कॅप्टन केन विलियमन्सन किंवा कोच कोणीही उपस्थित नव्हतं.
भारतीय संघ कधी जाहीर होणार
आयसीसीच्या नियमानुसार संघ जाहीर करण्यास आता केवळं आज आणि उद्याचा वेळ शिल्लक आहे. त्यामुळं भारताचा टी-20 वर्ल्डकपसाठी संघ कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :