(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बाबर की बटलर, कोण रचणार इतिहास? T20 वर्ल्डकपवर नाव कोरण्यासाठी पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये महामुकाबला
T20 World Cup 2022 Final: टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरण्यासाठी पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये महामुकाबला. दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी दोन्ही संघ सज्ज.
T20 World Cup 2022 Final: बाबर आझमच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघानं आणि जोस बटलरच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या इंग्लंड क्रिकेट संघानं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. T-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना आज म्हणजेच, 13 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडणार आहे. दरम्यान, आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक वेळा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा हा चषक उंचावण्याचा मान कोणत्या संघाच्या पदरी पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
भारतीय वेळेनुसार, T-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना रविवारी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. पण, सुरुवातीपासूनच ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या सामन्यांवर आपली सावली ठेवून वावरणारा पाऊस, या सामन्यातही व्यत्यय आणू शकतो. ऑस्ट्रेलियातील हवामान खात्याकडून रविवारी मेलबर्नमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे अंतिम फेरीत पाऊस गोंधळ घालू शकतो.
बाबर आझम इतिहास रचणार?
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्त्वात पाकिस्तानी संघ विश्वचषकातील अंतिम लढत खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यंदाच्या विश्वषकात पाकिस्तानचा प्रवास तसा फारच रोमांचक राहिला आहे. त्यांची अंतिम फेरीपर्यंतची धाव ही रोमहर्षक 'पटकथे'पेक्षा कमी नव्हती, कारण ते स्पर्धेच्या पहिल्याच आठवड्यात बाद होण्याच्या मार्गावर होते. पण कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमुळे पाकिस्तानचं स्पर्धेतील अस्तित्व टिकून राहिलं.
पण स्पर्धेच्या दुसऱ्या आठवड्यात पाकिस्ताननं धडाक्यात पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून विश्वचषक स्पर्धेत पुनरागमन केलं. पाकिस्तानी चाहत्यांच्या प्रार्थना सार्थ ठरल्या आणि 1992 सारखा चमत्कार पुन्हा घडला, नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून जबरदस्त कामगिरी करून पाकिस्तानी संघ थेट ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला.
The final showdown 👊
— ICC (@ICC) November 12, 2022
Who's lifting the #T20WorldCup 🏆 at the MCG?
More on #PAKvENG 👉 https://t.co/2ka1DLuQmH pic.twitter.com/qDS6r7SNCc
इंग्लंडची मदार जोस बटलरच्या खांद्यावर
संपूर्ण टी-20 विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीपासूनच इंग्लंडचा दबदबा राहिला आहे. गुरुवारी झालेल्या भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीत इंग्लंडनं तब्बल 10 विकेट्सनं भारतावर मात करत धडाक्यातच अंतिम फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनियर आणि हॅरिस रौफ यांना इंग्लंडच्या जॉस बटलर, अॅलेक्स हेल्स, बेन स्टोक्स आणि मोईन अली यांच्यासारख्या धडाकेबाज खेळाडूंना मात देण्यासाठी उत्तर खेळी करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही.
आ देखे जरा किसमे कितना है दम...
मोठ्या सामन्यांमध्ये एक खेळाडू नेहमीच आपल्या खेळीनं सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. ते या सामन्यात कदाचित स्टोक्स करु शकतो. स्टोक्स 2019 च्या लॉर्ड्सच्या कामगिरीची पुनरावृत्ती करून पुन्हा एकदा स्वतःची दखल घेण्यास सर्वांना भाग पाडू शकतो.
आजच्या सामन्यावर पावसाचं सावट
मेलबर्नमध्ये रविवारी पावसाची 95 टक्के शक्यता असून, 25 मिमी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारी मेलबर्न येथे जवळपास 100 टक्के पावसाची शक्यता आहे. मुसळधार पाऊस आणि ढगांच्या गडगडाटाची शक्यता खूप जास्त आहे. दुर्दैवानं सोमवारच्या सामन्याच्या 'राखीव दिवसा'मध्येही पाच ते दहा मिमी पाऊस पडण्याची 95 टक्के शक्यता आहे.
...तर दोन्ही संघात ट्रॉफी विभागून दिली जाईल
अंतिम सामन्यात दोन्ही संघामध्ये 10 षटके खेळली पाहिजेत. पण पावसामुळं दोन्ही दिवस खेळ झाला नाही तर, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ट्रॉफी विभागून दिली जाईल, असा आयसीसीचा नियम आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :