(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2022: इंग्लंड सेमीफायनलमध्ये! श्रीलंकेच्या पराभवासह ऑस्ट्रेलियाचंही आव्हान संपुष्टात
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अतिशय महत्त्वाच्या आणि निर्णयाक सामन्यात इंग्लंडच्या संघानं श्रीलंकेचा चार विकेट्सनं (England Beats Sri Lanka) धुव्वा उडवला.
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अतिशय महत्त्वाच्या आणि निर्णयाक सामन्यात इंग्लंडच्या संघानं श्रीलंकेचा चार विकेट्सनं (England Beats Sri Lanka) धुव्वा उडवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर 142 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघानं दोन चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं सेमीफायनलचं तिकिट पक्क केलं. तर, श्रीलंकेच्या पराभवासह यजमान ऑस्ट्रेलियाचंही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.
ट्वीट-
GET IN! 🦁
— England Cricket (@englandcricket) November 5, 2022
Semi-finals here we come! 👏
Scorecard: https://t.co/54McmntVSg#T20WorldCup pic.twitter.com/nT74QlH4CJ
निसांकाची एकाकी झुंज
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं निर्धारित 20 षटकांत आठ विकेट्स गमावून इंग्लंडसमोर 142 धावांचं लक्ष्य ठेवलं. या सामन्यात सलामीवीर निसांकानं एकाकी झुंज दिली. त्यानं 45 चेंडूत दो चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीनं 67 धावा केल्या. निसांका व्यतिरिक्त फक्त भानुका राजपक्षेनं 20 धावांचा आकडा ओलांडू शकला. भानुका राजपक्षे 22 धावा करून बाद झाला. मात्र, त्यानंतर श्रीलंकेच्या इतर कोणत्याही खेळाडूला संघाचा डाव सावरता आला नाही. इंग्लंडकडून मार्कवुडनं तीन विकेट्स घेतल्या. तर, बेन स्टोक्स, क्रिस वोक्स, सॅम करन आणि आदील रशीद यांच्यात खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स जमा झाली.
इंग्लंडचा चार विकेट्सनं विजय
श्रीलंकेनं दिलेल्या 142 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी इंग्लंडला धमाकेदार सुरुवात करून दिली. पॉवरप्लेमध्ये इंग्लंडनं एकही विकेट न गमावता 70 धावांचा आकडा गाठला. इंग्लंडची धावसंख्या 75 वर असताना वानिंदु हसरंगानं जोस बटलरच्या (28 धावा) रुपात इंग्लंडला पहिला धक्का बसला. त्यानंतर दहाव्या षटकात पुन्हा वानिंदु हसरंगानं हेल्सला (47 धावा) मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. इंग्लंडला तिसरा आणि चौथा धक्का अनुक्रमे ब्रुक्स (4) आणि लिव्हिंगस्टोन (4) यांच्या रूपानं बसला. इंग्लंडनं 111 धावांवर 5 विकेट गमावल्यानंतर बेन स्टोक्स पुन्हा एकदा संघासाठी तारणहार ठरला. त्यानं 42 धावांची खेळी करत इंग्लंडच्या पदरात विजय टाकला.
श्रीलंकेचा पराभवासह ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात
टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील 'अ' गटातून न्यूझीलंडच्या संघानं सर्वात प्रथम सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलं. मात्र, दुसऱ्या स्थानासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शर्यत लागली होती. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची गुण संख्या सात-सात अशी आहे. परंतु, ऑस्ट्रेलियाचा रनरेट इंग्लंडच्या तुलनेत खराब आहे. यामुळं ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलचं तिकीट मिळणार की नाही, हे श्रीलंकेच्या कामगिरीवर अवलंबून होतं. जर आजचा सामना श्रीलंकेनं जिंकला असता तर, इंग्लंडचे पाचच गुण राहिले असते आणि ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनल गाठण्याचा मार्ग मोकळा झाला असता. पण इंग्लंडनं श्रीलंकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आणलं आहे.
हे देखील वाचा-