(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2022 : टीम इंडियासमोर सेमीफायनलमध्ये इंग्लंडचं आव्हान, पण 'या'3 गोष्टींमुळे वाढलंय टेन्शन
IND vs ENG : टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा सामना सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध होणार आहे. 10 नोव्हेंबरला दोघेही आमने-सामने असतील.
T20 World Cup 2022 : टी 20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) भारताचा उपांत्य फेरीचा अर्थात सेमीफायनलचा सामना अॅडलेडच्या मैदानावर इंग्लंडसोबत (IND vs ENG) होणार आहे. टीम इंडिया सध्या सर्वाधिक गुणांसह मजबूत स्थितीत आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांच्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची फलंदाजी जोरदार होत आहे. मात्र या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाची सलामी आतापर्यंत चांगली झालेली नाही. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यात दमदार भागीदारी झालेली नाही. त्याचबरोबर गोलंदाजीही चिंतेचे कारण आहे.1987 मधील 50 षटकांच्या विश्वचषकानंतर, टीम इंडिया पहिल्यांदाच कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत इंग्लंडचा सामना करणार आहे. विशेष म्हणजे 1987 मध्ये देखील इंग्लंडने 35 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघातील तीन मोठ्या कमतरता कोणत्या ते पाहूया...
1.कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म
टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या कर्णधार रोहित शर्माची फलंदाजी आहे. रोहित शर्माने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये केवळ 89 धावा केल्या आहेत. नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक ठोकण्याशिवाय त्याला एकाही सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यात सराव सत्रात दुखापतीमुळे तो काही काळ त्रस्त असल्याचंही समोर आलं होतं. ज्यामुळे रोहितचा फॉर्म एक चिंतेचा विषय आहे.
2.पॉवरप्लेमध्ये स्लो रन रेट
पॉवर प्लेचा फायदा टीम इंडियाला अजून घेता आलेला नाही. सलामीची जोडी लवकर बाद झाल्याने दबाव वाढतो आणि नवीन फलंदाजांना अधिक सावधपणे खेळण्यासाठी पॉवर प्लेमध्ये संथ खेळावं लागतं. सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात न केल्याने दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये 'करा किंवा मरो' अशी परिस्थिती निर्माण होते. अशा स्थितीत सूर्यकुमार यादवसारखा फलंदाज खेळला नाही तर धावसंख्या कमी राहू शकते.
गोलंदाजीसह फिल्डिंगचं टेन्शन
टीम इंडियाची वेगवान गोलंदाजी सध्या चांगली आहे. अर्शदीप सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेत आहे. त्याला भुवनेश्वर आणि मोहम्मद शमीची चांगली साथ मिळत आहे. पण भारतासाठी सर्वात मोठे टेन्शन आहे ते फिरकी गोलंदाजीचे. आर अश्विन नक्कीच विकेट घेत आहे पण त्याला एकाच षटकात बऱ्याच धावाही पडत आहेत. अक्षर पटेलबाबतीतही तसंच होत आहे. त्यात चहलला अजून संधीच मिळालेली नाही. याशिवाय टीम इंडियाच्या फिल्डिंगमध्ये जाडेजा नसल्याने बरीच कमतरता दिसून येत आहे.
हे देखील वाचा-