एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोण होणार यंदाचा महाराष्ट्र केसरी?
महाराष्ट्र केसरी किताबासाठी यंदा एक ना अनेक नावांची चर्चा आहे. त्या चर्चेतलं पहिलं नाव आहे अर्थातच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचं
पुणे : 2014... विजय चौधरीने सचिन येलभरला हरवून पहिल्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ किताबावर नाव कोरलं. 2015... विजय चौधरीने विक्रांत जाधवला लोळवून सलग दुसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची मानाची गदा जिंकली आणि 2016... विजय चौधरीने अभिजीत कटकेला नमवून सलग तिसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ ठरण्याचा पराक्रम गाजवला.
भारताचा ऑलिम्पियन पैलवान नरसिंग यादवने 2011, 2012 आणि 2013 असा सलग तीन वर्षे महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता. त्यानंतर पुढची तीन वर्ष विजय चौधरीने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा जिंकून हॅटट्रिक साजरी केली.
रोहित पटेल आणि अमोल बुचडे यांचा हा पठ्ठ्या आता पोलीस सेवेत दाखल झाला आहे. विजय चौधरीचं सध्या डीवायएसपीचं ट्रेनिंग सुरू आहे. त्यामुळे तो यंदा महाराष्ट्र केसरीत खेळू शकणार नाही. मग विजय चौधरीच्या अनुपस्थितीत कोण होणार 2017 सालचा महाराष्ट्र केसरी, या प्रश्नाच्या उत्तराची उत्सुकता महाराष्ट्राच्या कुस्तीशौकिनांना लागली आहे.
महाराष्ट्र केसरी किताबासाठी यंदा एक ना अनेक नावांची चर्चा आहे. त्या चर्चेतलं पहिलं नाव आहे अर्थातच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचं. चंद्रहारच्या खजिन्यात 2007 आणि 2008 सालच्या महाराष्ट्र केसरीची गदा आहे. त्यानंतर कामगिरीतला चढउतार आणि बळावलेली दुखापत यामुळं चंद्रहारला महाराष्ट्र केसरी जिंकता आला नाही.
सांगली जिल्ह्यातल्या भाळवणी गावचा हा पठ्ठ्या यंदा नव्या जोमाने महाराष्ट्र केसरी उतरला आहे. चंद्रहारने वयाची पस्तिशी ओलांडली असली तरी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याची त्याची जिद्द कायम आहे.
पुण्याचा अभिजीत कटके हाही यंदा महाराष्ट्र केसरी किताबाच्या शर्यतीत आहे. जेमतेम विशीतल्या अभिजीतला गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरीतही उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. पण महान भारत केसरी किताबाने त्याचं मनोबल खचू दिलेलं नाही. गेल्या वर्षभरातला सारा अनुभव अभिजीतला यंदाही महाराष्ट्र केसरी किताबाच्या शर्यतीत राखेल.
चंद्रहार पाटील आणि अभिजीत कटके यांच्याबरोबरच लातूरचा सागर बिराजदार, कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा माऊली जमदाडे, सातारच्या मोही गावचा किरण भगत, पुणे शहरचाच साईनाथ रानवडे, बुलडाण्याचा बाला रफिक शेख, मुंबई उपनगरचा विक्रांत जाधव ही नावंही महाराष्ट्र केसरीच्या शर्यतीत आहेत. या आठ पैलवानांपैकीच कुणीतरी एक की, कुणीतरी नवा पठ्ठ्या महाराष्ट्र केसरी जिंकतो याची कल्पना रविवारी भूगावच्या मैदानात येईल.
पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातलं भूगाव हे पैलवानांचंच गाव म्हणून ओळखलं जातं. पैलवानकीची परंपरा असलेल्या या गावाला यंदा महाराष्ट्र केसरीच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. महाराष्ट्राच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवणं जितकं मानाचं असतं, तितकंच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या यजमानपदाची संधी मिळणं मानाचं असतं.
त्यात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक मामासाहेब मोहोळ यांचं जन्मगावही मुळशी तालुक्यात आहे. त्यामुळे यंदाच्या महाराष्ट्र केसरीचं आयोजन कुस्तीच्या घरात होत असल्याची जाणकारांची भावना आहे. साहजिकच कुस्तीच्या घरात महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकावतो, याबाबतची उत्सुकता त्यामुळे आणखी ताणली गेली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement