Brij Bhushan Singh: महिला खेळाडूंकडून लैंगिक शोषणाचा आरोप झालेले खासदार बृजभूषण सिंह आहेत तरी कोण?
राज ठाकरेंना नडणारे, महिला कुस्तीपटू, खेळाडूंनी अत्याचार आणि अन्यायाचा आरोप भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात केला आहे.
Brij Bhushan Sharan Singh: अध्यक्षांनी अनेक महिला खेळाडूंचे शोषणही केलं आहे, असा आरोप एका प्रसिद्ध महिला कुस्तीपटूने भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर केला आहे. त्याशिवाय बंजरंग पुनियानेही खेळाडूंवर अत्याचार होत असल्याचा आरोप केला. कुस्तीला दलदलीतून वाचवायचे आहे, खेळाडूंवर अत्याचार होत आहेत. एक-दोन दिवसांपूर्वी नियम बनवले जातात जे खेळाडूंवर लादले जातात. असोसिएशनचे अध्यक्ष केवळ प्रशिक्षक आणि पंचाची भूमिका बजावतात, गैरवर्तन करतात, असा आरोप कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी केलाय.
ज्या खेळाडूंनी कुस्तीमध्ये भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं केलं. तेच खेळाडू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात एकटवले आहेत...बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करत आहेत. या कुस्तीपटूंनी दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलन पुकारलं आहे. लैंगिक शोषण करतात, आम्हाला कोर्टाने, मोदींनी केंव्हाही बोलावू दे.. आम्ही देऊ, असं महिला कुस्तीपटू म्हणाली आहे.
दरम्यान बृजभूषण सिंह यांनी आपल्याविरोधात हे षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. यात कोणत्यातरी उद्योगपतीचा हात आहे. हे एक षडयंत्र आहे, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. खरंतर, बृजभूषण महाराष्ट्रात चर्चेत आले ते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून केलेल्या विरोधामुळेच... राज ठाकरेंना आयोध्येत पाय ठेवून देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
बृजभूषण सिंह आहेत तरी कोण ?
बृजभूषण सिंग हे भाजपचे खासदार आहेत. तब्बल सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले. उत्तर प्रदेशात गोंडा हा त्यांचा बालेकिल्ला आहे. बृजभूषण यांनी बालपणी अयोध्या आणि परिसरातले आखाडे गाजवले आहेत. कुस्तीचा छंद त्यांनी कायम ठेवला. राजकारणात आल्यानंतरही 10 वर्ष भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष भूषवलं आहे. उत्तर प्रदेशातल्या कुस्तीमध्ये त्यांचा शब्द हा अंतिम मानला जातो. बृजभूषण यांनी गेल्या कित्येक दशकांपासून हा दबदबा कायम ठेवला आहे. याच बृजभूषण यांनी नुकतीच पुण्यातही महाराष्ट्र केसरी स्पर्धेला उपस्थिती लावली होती. शिवाय महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्राला बोधामृत पाजण्याचा आवही आणला होता. त्याच बृजभूषण सिंह यांच्या जुलुमी राजवटीविरोधात भारताच्या आंतरराष्ट्रीय पैलवानांनी आंदोलनाला सुरुवात केली. हा वाद कुठवर जातो याकडे क्रीडा वर्तुळाचं लक्ष लागलं आहे..