T20 World Cup : पाकनं 'मौका' साधला! पंतप्रधान इम्रान खान यांचंही सेलिब्रेशन, म्हणाले, देशाला तुमचा अभिमान
T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकातील काल झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केलं. या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संघाचं अभिनंदन केलं आहे.
T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकातील काल झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात (India Vs Pakistan) पाकिस्तानने भारताला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी केली. विश्वचषकात भारताविरुद्ध विजय मिळवून पाकिस्तानने गेल्या अनेक वर्षांचा विक्रम मोडीत काढला. याआधी पाकिस्तानच्या संघाला विश्वचषकात भारताविरुद्ध एकही सामना जिंकता आला नाही. मात्र, बाबर आझमच्या नेतृत्वात काल पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने दारूण पराभव केला. पाकिस्तानच्या या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांनी संघाचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी एक फोटो ट्विट करत संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
Congratulations to the Pakistan Team & esp to Babar Azam who led from the front, as well as to the brilliant performances of Rizwan & Shaheen Afridi. The nation is proud of you all. pic.twitter.com/ygoOVTu37l
— Imran Khan (@ImranKhanPTI) October 24, 2021
इम्रान खान यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तान संघाचे आणि विशेषतः बाबर आझमचे ज्याने संघाचं नेतृत्व केलं. तसेच रिझवान आणि शाहीन आफ्रिदीच्या शानदार कामगिरीबद्दल अभिनंदन. देशाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे, असं इम्राननं म्हटलं आहे.
कालच्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला 20 षटकात 7 विकेट्स गमावून 151 धावा केल्या. भारताने दिलेले लक्ष्य पाकिस्तानच्या सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करीत संघाला 17व्या षटकात विजय मिळवून दिला.
नाणेफेक गमवल्यानंतर भारताकडून सलामी देण्यासाठी मैदानात आलेले रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना चांगली कामगिरी करता आली नाही. रोहित शर्माने शून्यावर त्याची विकेट्स गमावली. तर, केएल राहुलने 8 चेंडूत केवळ 3 धावा करून माघारी परतले. यांच्यापाठोपाठ सुर्यकुमार यादवही 11 धावा करून आऊट झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने ऋषभ पंतला सोबत घेत किल्ला लढवला. विराटने जबरदस्त अर्धशतकी खेळी करत पंतसोबत अर्धशतकी भागीदारी केली. आफ्रिदीने भारताच्या रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना स्वस्तात तर डावाच्या शेवटी विराट कोहलीला तंबूत धाडले. विराट कोहलीने 49 चेंडूत सर्वाधिक 57 धावा केल्या. दरम्यान, भारताला 20 षटकात 151 धावापर्यंत मजल मारता आली.
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझमने आक्रमक खेळी केली. ज्यामुळे पाकिस्तानच्या संघाला भारतावर 10 विकेट्सने विजय मिळवता आला आहे. दरम्यान, मोहम्मद रिझवानने 55 चेंडूत 79 तर, बाबर आझमने 52 चेंडूत 68 धावा केल्या.