खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जातेय - पंतप्रधान मोदी
Khelo India : खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे आणि त्यात खेलो इंडिया अभियानाने मोठी भूमिका बजावली आहे
Khelo India : खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे आणि त्यात खेलो इंडिया अभियानाने मोठी भूमिका बजावली आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2023 सुरु झाल्याची घोषणा केली. या स्पर्धेत 21 क्रीडा प्रकारांमध्ये 200 हून अधिक विद्यापीठांमधील 4750 हून अधिक खेळाडूंचा सहभाग असेल.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2023 च्या आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आणि सांगितले की उत्तर प्रदेश आज क्रीडा प्रतिभांचा संगम बनला आहे. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेणारे 4000 खेळाडू विविध राज्यातून आणि प्रदेशातून आले आहेत असे पंतप्रधान म्हणाले आणि राज्याचे खासदार म्हणून त्यांचे विशेष स्वागत केले. या स्पर्धेचा समारोप समारंभ त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना तिसरी खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे महत्त्व लक्षात घेऊन पंतप्रधान म्हणाले की, ही स्पर्धा सांघिक भावनेसह 'एक भारत श्रेष्ठ भारत'ची भावना जागृत करण्यासाठी एक उत्कृष्ट माध्यम बनले आहे. विविध प्रांतातून येणारे खेळाडू एकमेकांशी संवाद साधतील आणि उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी भेट देतील जिथे या स्पर्धा होत आहेत असे ते म्हणाले. यामुळे अशा ठिकाणांशी अनोखे बंध निर्माण होतील आणि खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतला सहभाग सर्व खेळाडूंसाठी एक सुखद आठवण राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी स्पर्धांमध्ये भरघोस यश मिळवण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 9 वर्षात भारतात खेळांचे नवे पर्व सुरू झाले असून भारताला क्रीडा क्षेत्रात केवळ महासत्ता बनवण्याचे नाही तर खेळाच्या माध्यमातून समाजाला सक्षम बनवण्याचे हे युग आहे असे पंतप्रधान म्हणाले. यापूर्वी खेळांबद्दल उदासीनता होती ,खेळांना सरकारकडून आवश्यक पाठिंबा मिळत नव्हता असे ते म्हणाले. त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील मुलांना खेळात प्राविण्य मिळवणे अत्यंत कठीण झाले होते. करिअर म्हणून मर्यादित वाव असल्याने अनेक पालक खेळाकडे दुर्लक्ष करत असे सांगून खेळाकडे पाहण्याच्या पालकांच्या दृष्टिकोनात झालेला मोठा बदल पंतप्रधानांनी अधोरेखित केला. “खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे आणि त्यात खेलो इंडिया अभियानाने मोठी भूमिका बजावली आहे,”असे ते म्हणाले.