Team India : भारताची उपांत्य फेरीत धडक, ग्रेट ब्रिटनला पेनल्टी शुट आऊटमध्ये लोळवलं, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Team India : भारताच्या हॉकी संघानं ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ग्रेट ब्रिटनला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत करत भारतानं उपांत्य फेरी गाठली
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) भारताच्या हॉकी (Team Hockey India) संघानं पेनल्टी शुट आऊटमध्ये ग्रेट ब्रिटनला उपांत्यपूर्व पराभूत केलं आहे. पेनल्टी शुट आऊटमध्ये भारतानं ग्रेट ब्रिटनला 4-2 अशा फरकानं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केल्यानं मॅचचा निकाल पेनल्टी शुट आऊटद्वारे लावण्यात आला. भारताचा गोलकीपर श्रीजेश यानं जोरदार बचाव केल्यानं आणि भारताच्या हॉकी खेळाडूंनी पेनल्टी शुट आऊटमध्ये 4 गोलं केल्यानं ब्रिटनला पराभवाचा धक्का बसला. भारताची उपांत्य फेरीतील लढत आता 6 ऑगस्ट रोजी होणार आहे.
ग्रेट ब्रिटन आणि भारत यांच्यातील मॅचमधील पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. पहिल्या क्वार्टरनंतर भारताचा अमित रोहिदास याला रेड कार्ड देण्यात आलं. त्यामुळं तो बाहेर गेला यानंतर भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग यानं एक गोल केला. त्यानंतर ब्रिटनच्या ली मॉर्टन यानं गोल केल्यानं1-1 अशी बरोबरी झाली. त्यानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही.
भारताच्या बचाव फळीनं दमदार कामगिरी करत ब्रिटनला पुन्हा एकही गोल करु दिला नाही. पुढच्या दोन्ही क्वार्टरमध्ये भारताच्या बचाव फळीनं आणि गोल कीपर श्रीजेशनं बचाव करत ब्रिटनचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. अखेर मॅच पेनल्टी शुट आऊटमध्ये गेली. तिथं भारतानं 4-2 असं ग्रेट ब्रिटनला पराभूत केलं.
ब्रिटनकडून पहिला गोल जेम्स एल्बेरी यानं केला. यानंतर कॅप्टन हरमनप्रीत सिंह यानं गोल करताना ग्रेट ब्रिटनच्या गोल कीपरला चकवा दिला आणि भारताकडून पहिला गोल केला. यानंतर ब्रिटननं एक गोल केला. भारताकडून सुरजीत आणखी एक गोल केला. इंग्लंडचे यापुढचे दोन गोल करण्याचे प्रयत्न भारताचा गोल कीपर पीआर श्रीजेशनं हाणून पाडला. पेनल्टी शुट आऊटमध्ये भारताकडून तिसरा गोल ललितनं केला. भारताकडून चौथा गोल राजकुमार पाल यानं केला.
भारतानं सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताची उपांत्य फेरीतील लढत आता 6 ऑगस्टला होणार आहे.
पी.आर. श्रीजेशचा दमदार बचाव
भारताचा गोलकीपर पीआर श्रीजेश त्याच्या करिअरमधील शेवटचं ऑलिम्पिक खेळत आहे. आजच्या सामन्यात ग्रेट ब्रिटननं आक्रमक खेळी केली होती. या आक्रमक खेळीला रोखण्याचं काम श्रीजेश आणि बचाव फळीच्या खेळाडूंनी केलं. पीआर श्रीजेशच्या बचावामुळं ब्रिटनला गोल करता आले नाहीत. परिणामी मॅच पेनल्टी शुट आऊटमध्ये गेली. तिथं भारतासाठी दोन गोल श्रीजेशनं रोखले.
संबंधित बातम्या :