Indian Hockey Team :भारताचा स्पेनवर विजय, कांस्य पदक जिंकलं, नरेंद्र मोदींचा पॅरिसला फोन, हरमन साब म्हणत सुरुवात
Indian Hockey Team wins Bronze Medal: भारतीय हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर नाव कोरलं. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंगनं 2 गोल करत संघाला विजय मिळवून दिला आहे.

PM Modi Congratulates Indian Hockey Team नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाला कांस्य पदक मिळवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघासोबत फोनवरुन चर्चा केली. नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग, गोल कीपर पीआर श्रीजेश आणि संघातील इतर खेळाडूंसोबत संवाद साधला. पीआर श्रीजेशला नरेंद्र मोदी यांनी निवृत्तीबाबत शुभेच्छा देखील दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघातील खेळाडूंसोबत संवाद साधला. मोदी यांनी संवादाची सुरुवात हरमन साब म्हणत केली. भारतानं टोक्यो ऑलिम्पिकनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवल्याबाबत खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारताचा हॉकीमधील सुवर्णकाळ तुम्ही परत नक्की घेऊन याल, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
पीआर श्रीजेशसोबत खास संवाद
नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेशसोबत खास संवाद साधला. पीआर श्रीजेश तुम्ही निवृत्त होत असला तरी नव्या टीम इंडियाची उभारणी करावी लागेल, असंही मोदी म्हणाले. पीआर श्रीजेशनं यावेळी भारतीय संघ ग्रेट ब्रिटन विरुद्ध 10 खेळाडूंसह खेळताना कसा यशस्वी ठरला यासंदर्भातील माहिती देखील दिली. नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचा विजय देशातील प्रत्येक मुलगा लक्षात ठेवेल, असं म्हटलं.
नरेंद्र मोदी पुढं म्हणाले, जर्मनी विरूद्धच्या पराभवानं तुमचं मनौधैर्य खचलं असेल. तुम्ही 24 तासात अपयश विसरुन कांस्य पदक जिंकलात हे देखील मोठं यश आहे. तुमच्या यशाचा सर्व देशाला अभिमान आहे, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघासोबत संवाद साधला.
नरेंद्र मोदी यांनी भारताच्या खेळाडूंच्या प्रकृतीची देखील विचारपूस केली. भारताचा कोणता खेळाडू जखमी तर झाला नाही ना, असं त्यांनी विचारलं. यावर पीआर श्रीजेश यानं सर्व खेळाडू ऐतिहासिक विजयानं आनंदित आहेत, असं मोदींना सांगितलं. नरेंद्र मोदींचा फोन संपताच खेळाडूंनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.
#WATCH | PM Narendra Modi spoke to the Indian Hockey team and congratulated them on the #Bronze medal victory. #OlympicGames #Paris2024 pic.twitter.com/OuuaEHVj0y
— ANI (@ANI) August 8, 2024
संंबंधित बातम्या :
मोठी बातमी : भारताच्या हॉकी संघाची कमाल, 'सरपंच' हरमनप्रीतची धमाल, ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
