Sushil Kumar Surrender : ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचं तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण, ज्युनियर कुस्तीपटूच्या हत्या प्रकरणात सुशील कुमार प्रमुख आरोपी
Sushil Kumar Surrender : ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येतील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे.
नवी दिल्ली (New Delhi) : ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येतील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारने (Sushil Kumar) दिल्लीच्या तिहार तुरुंगात (Tihar Jail) आत्मसमर्पण (Surrender) केलं आहे. सुशील कुमारने रविवारी (13 ऑगस्ट) रात्री उशिरा तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण केलं. त्याच्यावर ज्युनियर अॅथलीट सागर धनखडचा (Sagar Dhankar) खून यासह दंगल आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. सागर धनखडच्या हत्येच्या आरोपाखाली सुशील कुमार 2021 पासून तुरुंगात आहे.
जामीनावर बाहेर आलेल्या सुशील कुमारच्या गुडघ्याचे ऑपरेशन
सुशील कुमार जामीनावर बाहेर होता. रोहिणी कोर्टाने सुशील कुमारला 23 जुलै ते 30 जुलैपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. नंतर त्याचा कालावधी आणखी काही दिवस वाढवण्यात आला. यादरम्यान सुशीलच्या गुडघ्याचे ऑपरेशन झालं. सुशीलला जामीन मंजूर करताना, त्याच्यासोबत दिल्ली पोलिसांचे दोन कर्मचारी असतील, असा आदेश न्यायालयाने दिला होता. यासोबतच सुशील कुमार साक्षीदारांशी कोणत्याही प्रकारे धमकावणार नसल्याचंही सांगण्यात आलं.
2021 मध्ये मारहाणीत कुस्तीपटू सागरचा मृत्यू
सुशील कुमारने त्याच्या साथीदारांसह 23 वर्षीय कुस्तीपटू सागर धनखड, त्याचा मित्र सोनू आणि अन्य तिघांवर 4 मे 2021 रोजी रात्री दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये मालमत्तेच्या कारणावरुन हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर झालेल्या सागर धनखरचा मृत्यू झाला. मारहाणीनंतर दुसऱ्याच दिवसापासून सुशील कुमार पसार झाला होता. 17 दिवसांनंतर 23 मे रोजी सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. सध्या या हत्येशी संबंधित सुशील कुमारसह अनेक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून ते तिहार तुरुंगात आहेत.
हत्या प्रकरणात 20 जण आरोपी
सागर धनखडच्या हत्ये प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारसह 20 जणांना आरोपी बनवलं आहे. त्यापैकी 18 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. सागर धनखड हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एकूण 1100 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं, ज्यामध्ये सुशील कुमारला मुख्य आरोपी बनवण्यात आलं होतं. पोलिसांनी या प्रकरणात 155 साक्षीदार हजर केले आहेत.
संबंधित बातमी
Sagar Dhankar Murder Case: दिल्ली कोर्टात कुस्तीपटू सुशील कुमारसह 18 जणांवरील आरोप निश्चित