Neeraj Chopra: पाकिस्तानच्या अर्शद नदीमला भारतात बोलावल्यामुळे नीरज चोप्रा ट्रोल, मौन सोडत म्हणाला, माझ्यासाठी देश प्रथम!
Neeraj Chopra: नीरज चोप्राने ट्रोल झाल्यानंतर म्हटलं की, मी इतकी वर्षे अभिमानाने माझ्या देशाची सेवा केली आहे, त्यामुळे माझ्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे पाहून वाईट वाटते. मला आणि माझ्या कुटुंबाला कोणत्याही ठोस कारणाशिवाय लक्ष्य करणाऱ्या लोकांसमोर मला स्वतःचे स्पष्टीकरण द्यावे लागत आहे याचे मला वाईट वाटते.

Neeraj Chopra: 'नीरज चोप्रा क्लासिक' स्पर्धेत पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमला आमंत्रित केल्याच्या वादात भारताचा स्टार खेळाडू, ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने आपले मौन सोडले आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापूर्वी, नीरजने भारतात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी अर्शद नदीमला आमंत्रित केले होते. त्यानंतर आता त्यांनी स्पष्ट केले आहे की, त्याचा निर्णय केवळ खेळ आणि खेळाडूंच्या सन्मानाशी संबंधित होता, कोणत्याही राजकीय किंवा भावनिक अजेंडाशी संबंधित नव्हता. या प्रकरणात, त्याने त्याच्या आईला ट्रोल करणाऱ्यांवरही प्रतिक्रिया दिली आहे. नीरज चोप्राने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पॅरिस ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमने 'नीरज चोप्रा क्लासिक' कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता हे लक्षात ठेवा, असंही म्हटलं आहे.
नीरजच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये काय?
नीरज चोप्रा यानी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले आहे की, मी सहसा खूप कमी बोलतो, परंतु जेव्हा माझ्या देशाच्या, माझ्या कुटुंबाच्या आणि सत्याचा प्रश्न येतो तेव्हा मी गप्प राहू शकत नाही. त्यानी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, अर्शद नदीमला एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूला आमंत्रण देण्यात आले होते आणि त्याचा उद्देश भारताला जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनवणे हा होता. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधी सोमवारी सर्व खेळाडूंना या कार्यक्रमाची निमंत्रणे पाठविण्यात आली. या पोस्टमध्ये नीरजने स्पष्ट केले की, पहलगाम हल्ल्यानंतरच्या परिस्थितीमुळे अर्शदचा सहभाग रद्द करण्यात आला आहे. नीरज म्हणाला, अशा परिस्थितीत अर्शदला येणे अजिबात शक्य नव्हते.
आईला लक्ष्य केल्यामुळे नीरज चोप्रा दुःखी
या पोस्टमध्ये नीरजने आपले दुःख व्यक्त केले आहे. त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर झालेल्या ट्रोलींगमुळे तो दुखावला गेला आहे. पोस्टमध्ये नीरज म्हणतो, आम्ही सामान्य माणसे आहोत, कृपया गैरसमज करून घेऊ नका, काही माध्यमांमध्ये खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत.
त्यांच्या आईच्या एका जुन्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी लोकांच्या दुटप्पीपणावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.एक वर्षापूर्वी जेव्हा माझ्या आईने बोललं होतं, तेव्हा तिचं कौतुक झालं. आता तेच लोक त्याच गोष्टीसाठी तिला ट्रोल करत आहेत.
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) April 25, 2025
नीरज चोप्रा यांची संपूर्ण पोस्ट शब्दशः
मी जास्त बोलणारा माणूस नाही, पण जेव्हा देशाचा, कुटुंबाचा सन्मान आणि चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रश्न येतो तेव्हा मी गप्प राहू शकत नाही. अलिकडेच मी अर्शद नदीमला 'नीरज चोप्रा क्लासिक' मध्ये येण्यासाठी आमंत्रित केले. याबद्दल बरीच चर्चा झाली आणि अनेक लोकांनी द्वेषपूर्ण टिप्पण्या केल्या. माझ्या कुटुंबालाही लक्ष्य करण्यात आले. मी अर्शदला खेळाडू म्हणून बोलावले, बस्स. त्याचा दुसरा काही अर्थ नव्हता. या कार्यक्रमाचा उद्देश जगातील सर्वोत्तम खेळाडूंना भारतात आणणे हा होता, जेणेकरून आपला देश देखील जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचा भाग बनू शकेल. सर्व खेळाडूंना आमंत्रण सोमवारी पाठवण्यात आले होते, जे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधी होते.
आता गेल्या 48 तासांत इतक्या दुःखद घटना घडल्या आहेत, त्यामुळे आता अर्शदचे येणे देखील अशक्य आहे. माझ्यासाठी देश प्रथम येतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो, या घटनेबद्दल मला खूप दुःख आणि राग आहे. पण मला पूर्ण विश्वास आहे की, आपला देश याला एकजुटीने या गोष्टीला प्रतिसाद देईल आणि आपल्याला न्याय मिळेल.
मी वर्षानुवर्षे अभिमानाने माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. म्हणूनच जेव्हा लोक माझ्या हेतूंवर प्रश्न विचारतात तेव्हा मला वाईट वाटते. मला आणि माझ्या कुटुंबाला कोणतेही कारण नसताना लक्ष्य केले जात आहे. आम्ही सामान्य माणसे आहोत, गैरसमज करून घेऊ नका. माध्यमांमधील काहींनी आमच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या आहेत. पण मी गप्प राहतो म्हणून त्या गोष्टी खऱ्या आहेत असे होत नाही. कधीकधी मला कळत नाही की, लोक इतक्या लवकर कसे बदलतात. माझ्या आईने एक वर्षापूर्वी अगदी सोप्या भाषेत काहीतरी सांगितले होते, तेव्हा लोक तिचे कौतुक करत होते. आता तेच लोक त्याच गोष्टीसाठी तिला ट्रोल करत आहेत. मी आता अधिक मेहनत करेन. जेणेकरून जग भारताला बघून जळणार नाही तर त्यांना आपला हेवा वाटेल, आणि आपल्या देशाला ते योग्य कारणांसाठी लक्षात ठेवतील. जय हिंद.
हा कार्यक्रम पंचकुलाऐवजी बेंगळुरूमध्ये होणार
नदीमने पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये 92.97 मीटरच्या विक्रमी फेकसह सुवर्णपदक जिंकले, तर चोप्राने 89.45 मीटरच्या फेकसह रौप्यपदक जिंकले. ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स आणि जर्मनीचा थॉमस रोलरसारखे स्टार खेळाडू पहिल्या नीरज चोप्रा भालाफेक स्पर्धेत सहभागी होत आहेत. पुरेशा प्रकाशाच्या अभावी नीरज चोप्रा क्लासिक भालाफेक स्पर्धेचा पहिला टप्पा 24 मे रोजी पंचकुलाऐवजी बेंगळुरूमध्ये होणार आहे. हा कार्यक्रम चोप्रा आणि जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स संयुक्तपणे अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय) आणि वर्ल्ड अॅथलेटिक्स यांच्या सहकार्याने आयोजित करतील.























