'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव
पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या...
जागतिक क्रिकेटमध्ये 'प्रोफेसर' म्हणून ओळखला जाणारा माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद हाफीजने टी-20मधील सर्वोत्तम खेळाडूचे नाव जाहीर केले आहे. मोहम्मद हाफिजला एका कार्यक्रमात तुम्हाला कोणत्या विदेशी खेळाडूला कोणत्याही किंमतीत संघात ठेवायला आवडेल?, असा प्रश्न केला. यावर मोहम्मद हाफिजने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचे नाव घेतले. विराट कोहली, सुर्यकुमार यादव नाही, तर रोहित शर्मा टी-20 मधील सर्वोतकृष्ट खेळाडू असल्याचं मोहम्मद हाफिजने सांगितले. तसेच रोहित शर्मा कर्णधारपदी सांभाळू शकतो, त्यामुळे त्याला माझ्या संघात ठेवण्याचा मी प्रयत्न करेन, असे हाफिजने सांगितले.
रोहितचा फॉर्म अलीकडच्या काळात जबरदस्त आहे. 2023 च्या विश्वचषकातही रोहित शर्माने अनेक सामन्यांमध्ये वेगवान धावा करून भारताला झंझावाती सुरुवात करून दिली होती. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहितच्या बॅटमधून खूप धावा झाल्या होत्या. रोहितने इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यात 400 धावा केल्या ज्यात त्याने आपल्या बॅटने दोन शतके झळकावली.
रोहित शर्मा देखील T20 क्रिकेटमध्ये (T20 सर्वोत्कृष्ट खेळाडू रोहित शर्मा) शानदार फलंदाजी करण्यात पटाईत आहे. रोहित शर्माच्या आयपीएल विक्रमाबद्दल बोलायचे झाल्यास, रोहितने 243 सामन्यांमध्ये एकूण 6211 धावा केल्या आहेत ज्यात एक शतक आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. T-20 मध्ये रोहितच्या नावावर एकूण 11,156 धावा आहेत ज्यात 7 शतके आणि 74 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचवेळी, रोहितची टी-20मध्ये सरासरी 30.73 आणि स्ट्राइक रेट 133.82 आहे.
आयपीएलमध्ये रोहित यशस्वी कर्णधार
आता आयपीएलचा नवा हंगाम सुरू होणार आहे. यावेळी रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार नाही. त्याच्या जागी व्यवस्थापनाने हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. रोहित हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. रोहितने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावण्यात यश मिळवले होते.
आयपीएलआधीच मुंबई इंडियन्सला धक्का
मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात विरुद्धच्या मॅचमधून मोहीम सुरु करेल. 24 मार्चला गुजरात आणि मुंबई यांच्यात पहिली लढत होणार आहे. या लढतीत सूर्यकुमार यादव दुखापतीमुळं खेळू शकणार नसल्यानं नेहाल वढेरा याला संधी मिळू शकते. नेहाल वढेरानं 2023 च्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. सूर्यकुमार यादवनं काल आयपीएलमधील मुंबईच्या पहिल्या मॅचमध्ये खेळता येणार नसल्याचे संकेत दिले होते. मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलचा हा सीझन महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबईच्या टीमला आयपीएलच्या गेल्या दोन हंगामामध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती. दरम्यान, आयपीएलमध्ये मुंबईचा दुसरा सामना सनरायजर्स हैदराबाद यांच्या विरोधात 27 मार्चला होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरोधात 1 एप्रिलला होणार आहे.