विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत संघातून डावललं, मिताली राजचं बीसीसीआयला पत्र
बीसीसीआयमधली काही ताकदवान माणसं माझी कारकीर्द संपवण्यासाठी टपून बसली आहेत, असा आरोप मितालीनं या पत्रात केला आहे. डायना एडलजी यांनी आपल्या पदाचा माझ्याविरोधात वापर केला, या शब्दात मितालीनं हल्ला चढवला.
मुंबई : महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघातून डावलण्यात आलेल्या मिताली राजनं बीसीसीआयला पत्र पाठवलं आहे. या पत्रात प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडलजी आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर तोफ डागली आहे.
बीसीसीआयमधली काही ताकदवान माणसं माझी कारकीर्द संपवण्यासाठी टपून बसली आहेत, असा आरोप मितालीनं या पत्रात केला आहे. डायना एडलजी यांनी आपल्या पदाचा माझ्याविरोधात वापर केला, या शब्दात तिनं हल्ला चढवला.
मिताली राजनं विश्वचषकाच्या साखळीत सातत्यानं धावांचा रतीब घातला होता. पण आयर्लंडविरुद्ध झालेल्या दुखापतीमुळं तिला ऑस्ट्रेलियासमोर विश्रांती देण्यात आली. मग मिताली राज तंदुरुस्त असूनही तिला उपांत्य फेरीसाठीच्या संघातून वगळण्यात आलं. मितालीच्या अनुपस्थितीत भारतीय महिलांना उपांत्य फेरीत इंग्लंडकडून लाजिरवाणी हार स्वीकारावी लागली.
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय महिला संघातून डावलण्यात आलेल्या मिताली राजनं कर्णधार हरमनप्रीत कौरविषयी आपल्या मनात अजिबात शंका नसल्याचंही पत्रात स्पष्ट केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत मला वगळण्याच्या प्रशिक्षक रमेश पोवार यांच्या निर्णयाला हरमनप्रीतनं दिलेला पाठिंबा मला गोंधळात टाकणारा आणि वेदनादायीही असल्याचंही तिनं म्हटलं आहे.
भारताला ट्वेन्टी ट्वेन्टीचा विश्वचषक जिंकून माझा निश्चय होता. पण इंग्लंडविरुद्धच्या पराभवानं ती संधी हुकल्याचं आपल्याला दु:ख असल्याची भावनाही तिनं व्यक्त केली आहे.