KXIP vs RR: 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने रचला इतिहास! टी -20 क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारा पहिला फलंदाज
'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 63 चेंडूत 99 धावांची तुफानी खेळी केली. या दरम्यान त्याने 6 चौकार आणि आठ षटकार लगावले.
KXIP vs RR : आयपीएल 2020 च्या 50व्या सामन्यात 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 99 धावांची तुफानी खेळी केली. या दरम्यान त्याने 6 चौकार आणि आठ षटकार लगावले. यासह टी -20 क्रिकेटमध्ये गेलने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. टी -20 क्रिकेटमध्ये गेलने एक हजार षटकारांचा रेकॉर्ड केला आहे. टी -20 क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा गेल पहिला फलंदाज ठरला आहे.
गेल राजस्थानविरुद्ध फलंदाजीला आला होता तेव्हा हे लक्ष्य पूर्ण करण्यापासून तो सात षटकारांच्या अंतरावर होता. गेलने तुफानी खेळी करत डावाच्या 19 व्या षटकात कार्तिक त्यागीच्या 5 व्या चेंडूवर कारकिर्दीतील 1000 वा षटकार लगावला. राजस्थानविरुद्धच्या खेळीत गेलने एकूण आठ षटकार ठोकले. पण त्याचं शतक अवघ्या एका धावेनं हुकलं. तो 99 धावांवर बाद झाला. गेलला जोफ्रा आर्चरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
टी -20 क्रिकेटमधील गेलचा विक्रम मोडणे आता अशक्य मानले जात आहे. कारण या यादीमध्ये किरन पोलार्ड दुसऱ्या स्थानावर आहे. पोलार्डच्या नावावर टी -20 क्रिकेटमध्ये 690 षटकार तर गेलच्या नावावर 1 हजार षटकार आहेत. पोलार्ड गेलपेक्षा खूप मागे आहे, त्यामुळे गेलचा हा विक्रम मोडणे आता अशक्य मानले जात आहे.
"In my mind, it's a century."#UniverseBoss #Dream11IPL | @henrygayle pic.twitter.com/rfD1T12Krk
— IndianPremierLeague (@IPL) October 30, 2020
99 धावा केल्या तरीही ख्रिस गेलने त्यास शतक मानले. पंजाबचा डाव संपल्यानंतर गेल म्हणाला की त्याचा डाव एका शतकापेक्षा कमी नाही.
गेलने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जीवावर किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्यांदा खेळताना 20 षटकांत चार गडी गमावून 185 धावा केल्या आहेत. गेलशिवाय पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने 41 चेंडूत 46 आणि निक्लोस पुराणने 10 चेंडूत 22 धावा केल्या.