Kolhapur Football : आमच्या कोल्हापूरचा विषय हार्डच असतो! व्हय आमच्या पाचवीला फुटबॉल पूजलाय
कोल्हापूर शहरात फुटबाॅल म्हणजे किती जीव की प्राण आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कोल्हापुरात गेल्या 10 ते 15 दिवसांपासून चौकाचौकात, गल्लोगल्लीत फुटबाॅल वर्ल्डकपचे कटआऊट अन् बॅनर सजले आहेत.
Kolhapur Football : कोल्हापूर शहरात फुटबाॅल म्हणजे किती जीव की प्राण आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. फुटबाॅल वर्ल्डकप आजपासून कतारमध्ये रंगणार आहे. मात्र, गेल्या कोल्हापुरात गेल्या 10 ते 15 दिवसांपासून 'सपोर्ट सिस्टम' कार्यान्वित झाली असून चौकाचौकात, गल्लोगल्लीत फुटबाॅल वर्ल्डकपचे कटआऊट अन् बॅनर सजले आहेत. आता फुटबाॅलवेड्या कोल्हापुरात एकाने आपल्या लेकराच्या पाचवीलाच फुटबाॅल आपलं प्रेम अधोरेखित केलं आहे.
कोल्हापूरात फुटबॉल ज्वर शिगेला पोहोचला आहे. शहरातील आझाद चौक, देवकर पाणंद, सायबर चौक, सरदार तालीम, बिंदू चौक, रंकाळा, खोलखंडोबा आदी परिसरात रोनाल्डो, मेस्सी, नेमारचे उंच कट-आऊटस् बॅनर लागले आहेत. गुलाब गल्लीत सहभागी संघाच्या पताका लावण्यात आल्या आहेत. आता यामध्ये फुटबॉलच पाचवीला पुजल्याने चर्चेचा विषय झाला आहे. कोल्हापुरातील नावाजलेला फुटबॉल संघ शिवाजी पेठेतील संध्यामठ तरुण मंडळातील कार्यकर्ते अजय जगदाळे यांनी खासगी नोकरी करत फुटबॉलप्रेम जोपासलं आहे.
जगदाळे यांना 14 नोव्हेंबर 2022 रोजी दुसऱ्यांदा मुलगा झाला. या लेकराच्या पाचवीला पूजा करण्यासाठी यांच्या घरी लगबग सुरु होती. हिंदू रीतीरिवाजानुसार सटवाई या बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी बाळाचं भविष्य लिहिण्यासाठी जगदाळेंच्या घरी अवतरल्यानंतर एकंदरीत जगदाळेंच्या घरची पूजेची तयारी बघून ती अवाक झाली नसेल तर नवल! कारण पाचवीच्या पूजेच्या साहित्यासोबत इथं मांडणी केली होती ती फुटबॉल मैदानाच्या प्रतिकृती आणि त्यावरील खेळाडूंच्या छोट्या कटआऊटस्ची. बाजूला होता एक फुटबॉल आणि शेजारीच संध्यामठ व इतर युरोपियन संघांचे टी शर्टस्. पाचवीची पूजा बघायला ख्रिस्तियानो रोनाल्डो देखील आपलं बूड टेकून शेजारी बसल्याची प्रतिकृती उभी केली होती.
जगदाळे यांच्या पहिल्या मुलाचा, अमेय जगदाळेचा जन्म ऑगस्ट 2019 चा. अमेयच्या पाचवीला देखील जगदाळे कुटुंबाने फुटबॉल साहित्याची मांडणी करुन पाचवीची पूजा केली होती. अमेयचा दिवस आता फुटबॉलशिवाय संपत नाही.
दुसरीकडे, कतारमधील फुटबाॅल वर्ल्डकप आज सुरु होत असतानाच कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम देखील सज्ज होत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून शाहू स्टेडियम रोमांच अनुभवणार आहे. आगामी हंगामासाठी 348 खेळाडू करारबद्ध झाले असून यामध्ये 24 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यावरून कोल्हापूरच्या फुटबाॅलची क्रेझ लक्षात येते. त्यामुळे तालीम तर आलीच पण प्रत्येक कट्ट्यावरही फुटबाॅलचे बारकावे, मेस्सी, रोनाल्डोचे किस्से, त्यांच्यावरील निर्व्याज प्रेम आणि कोल्हापुरी भाषेतील उद्धार सुद्धा सहजपणे कानावर येतो. त्यामुळेच की काय कोल्हापूर शहरामधील अनेक भिंतींवरील कटआऊट, दुकाने, गाड्यांची हेडलाईट सजून गेली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या