IPL2020, RCBvsKKR | रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी दणदणीत पराभव
एबी डिव्हिलियर्ससह बंगलोरच्या आघाडीच्या फलंदाजांनी शारजाच्या मैदानात तुफान फटकेबाजी केली. त्यामुळे बंगलोरला दोन बाद 194 धावांचा डोंगर उभारता आला.
IPL2020, RCBvsKKR | विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी दणदणीत पराभव केला. बंगलोरचा यंदाच्या मोसमातला हा पाचवा विजय ठरला. या सामन्यात बंगलोरनं कोलकात्याला विजयासाठी 195 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. पण बंगलोरच्या प्रभावी माऱ्यासमोर कोलकात्याला 9 बाद 112 धावांचीच मजल मारता आली.
कोलकाताकडून शुबमन गिलने सुरुवातीला चांगली खेळी केली. त्यानंतर मधल्या फळीत आंद्रे रसेलने फटकेबाजीचा प्रयत्न केला. मात्र बंगलोरच्या गोलंदाजांसमोर त्याला मोठी खेळी करता आली नाही. कोलकाताकडून शुभमन गिलने 34, आंद्रे रसेलने 19 आणि राहुल त्रिपाठी 16 धावांनी खेळी केली. इतर खेळांडूंन दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. वॉशिंग्टन सुंदरनं आणि ख्रिस मॉरिसनं प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन बंगलोरच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तर नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल आणि ईसुरु उदाना यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.
त्याआधी एबी डिव्हिलियर्ससह बंगलोरच्या आघाडीच्या फलंदाजांनी शारजाच्या मैदानात तुफान फटकेबाजी केली. त्यामुळे बंगलोरला दोन बाद 194 धावांचा डोंगर उभारता आला. डिव्हिलियर्सनं अवघ्या 33 चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 73 धावा फटकावल्या. तर कर्णधार विराटनं नाबाद 33 धावांची खेळी केली. त्याआधी अॅरॉन फिंच आणि देवदत्त पडिक्कलनं 67 धावांची सलामी दिली. फिंचनं 47 तर पडिक्कलनं 32 धावा केल्या.
रसेलच्या टी20त विकेट्सचं त्रिशतक
कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेलनं ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला. बंगलोरविरुद्धच्या सामन्यात रसेलनं पडिक्कलची विकेट घेत ट्वेन्टी ट्वेन्टीत 300 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो जगातला दहावा तर तिसरा वेस्ट इंडियन खेळाडू ठरला. 337 व्या सामन्यात रसेलनं हा विक्रमी टप्पा गाठला.