WPL 2023 : पुरुषांच्या आयपीएलच्या तुलनेत महिला प्रीमियर लीगच्या 'प्राईज मनी'मध्ये आहे खूपच फरक, वाचा नेमकी रक्कम
WPL 2023 : यंदा पार पडलेला महिला प्रीमियर लीगचा सलामीचा हंगाम मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरनं जिंकत ट्रॉफीवर नाव कोरलं.
WPL 2023 Winners Prize : महिला प्रीमियर लीगचे (WPL) पहिले विजेतेपद मुंबई इंडियन्सच्या नावावर झाले आहे. या जेतेपदासह मुंबई इंडियन्सच्या संघाला बक्षिसाची मोठी रक्कम मिळाली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला बक्षीस म्हणून 6 कोटी रुपये देण्यात आले आहेत. जरी ही रक्कम मोठी असली तरी पुरुषांच्या आयपीएलच्या तुलनेत खूपच कमी आहे. गतवेळच्या आयपीएल चॅम्पियनला एकूण 20 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. त्याचप्रमाणे, डब्ल्यूपीएल आणि आयपीएलच्या प्रत्येक श्रेणीच्या बक्षीस रकमेत मोठी तफावत आहे.
या दोन लीगच्या बक्षीस रकमेतही फरक आहे. याला बरीच कारणं असून आयपीएलची दर्शक संख्या डब्ल्यूपीएलपेक्षा खूप जास्त आहे. आयपीएलच्या प्रसारण हक्कांपासून ते प्रायोजकत्वासारख्या गोष्टींपर्यंत डब्ल्यूपीएलपेक्षा खूप जास्त कमाई आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय या दोन्ही लीगमध्ये समान बक्षीस रक्कम ठेवू शकत नाही. आयपीएल आणि डब्ल्यूपीएलच्या मोठ्या पुरस्कार विजेत्यांची बक्षीस रक्कम किती आहे? यात किती फरक आहे? जाणून घेऊ...
पुरस्कार | WPL 2023 | IPL 2022 |
विजेता संघ | 6 कोटी रुपये | 20 कोटी रुपये |
रनर-अप संघ | 3 कोटी रुपये | 13 कोटी रुपये |
ऑरेंज कॅप विनर (सर्वाधिक धावा) | 5 लाख रुपये | 15 लाख रुपये |
पर्पल कॅप विनर (सर्वाधिक विकेट्स) | 5 लाख रुपये | 15 लाख रुपये |
मोस्ट वॅल्यूबल प्लेअर ऑफ द सीजन | 5 लाख रुपये | 15 लाख रुपये |
कॅच ऑफ द सीजन | 5 लाख रुपये | 12 लाख रुपये |
इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीजन | 5 लाख रुपये | 20 लाख रुपये |
पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द सीजन | 5 लाख रुपये | 15 लाख रुपये |
IPL 2023 मध्ये बक्षीस रक्कम आणखी वाढणार
आयपीएल 2022 च्या तुलनेत, आयपीएल 2023 मध्ये प्रत्येक श्रेणीमध्ये बक्षीस रक्कम वाढू शकते. एकूण बक्षीस रक्कम 20 ते 25% ने वाढविली जाऊ शकते. तुम्हाला सांगूया की, गेल्या आयपीएलमध्ये एकूण 46.5 कोटी रुपये बक्षीस म्हणून वितरित करण्यात आले होते. येत्या काही दिवसांत आयपीएल 2023 च्या बक्षीस रकमेबाबत स्थिती स्पष्ट होईल.
मुंबई इंडियन्सचा फायनलमध्ये विजय
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाने दिल्लीचा पराभव करत पहिल्या महिला आयपीएल स्पर्धेवर नाव कोरले. सेविर ब्रंट हिने मोक्याच्या क्षणी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबईने जेतेपदाला गवसणी घातली. दिल्लीने दिलेले 132 धावांचे आव्हान मुंबईने सात विकेट राखून सहज पार केले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाली मुंबई संघाने इतिहास रचला. पहिल्या वहिल्या महिला आयपीएल स्पर्धेवर त्यांनी नाव कोरले. या स्पर्धेत मुंबईकडून गोलंदाजी आणि फलंदाजीत दमदार कामगिरी पाहायला मिळाली. वुमन्स प्रिमीयर लिगमधील आघाडीच्या पाच गोलंदाजात मुंबईच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. तर फलंदाजीतही मुंबईच्या खेळाडूंचा बोलबला राहिला. केर, ब्रंट आणि मॅथ्यूज यांनी संपूर्ण हंगामात अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन केले.
हे देखील वाचा-
- BCCI : बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून 11 खेळाडूंची चांदी, तर 9 खेळाडूंना झटका; वाचा सविस्तर