Will Jacks : विल जॅक्सच्या वादळात ख्रिस गेलच्या रेकॉर्डची धुळदाण, विराट कोहलीचा पण विक्रम मोडला
Will Jacks : आयपीएलमध्ये काल झालेल्या पहिल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं गुजरात टायटन्सचा 9 विकेटनं पराभव केला.
अहमदाबाद : आयपीएलमधील (IPL 2024) 45 व्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (Royal Challengers Bengaluru) गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) त्यांच्या होम ग्राऊंडवर 9 विकेटनी पराभूत केलं. विल जॅक्सच्या नाबाद 100 आणि विराट कोहलीच्या नाबाद 70 धावांच्या जोरावर आरसीबीनं गुजरातवर दणदणीत विजय मिळवला. विल जॅक्सनं या खेळीच्या जोरावर आयपीएलमधील ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला आहे. विल जॅक्सनं पहिलं अर्धशतक 31 बॉलमध्ये पूर्ण केलं. यानंतर जॅक्सनं शंभर धावांपर्यंत पोहोचण्याचा टप्पा केवळ 10 बॉलमध्ये पूर्ण केला.
विल जॅक्सनं ख्रिस गेलचं रेकॉर्ड मोडलं
गुजरात टायटन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुपुढं विजयासाठी 201 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. गुजरातनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 200 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं चांगली सुरुवात केली होती. मात्र, फाफ डु प्लेसिस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या विल जॅक्सला सुरुवातीला सूर सापडत नव्हते. मोठे फटके मारताना त्याला अडचणी येत होत्या. मात्र, विराट कोहलीनं त्याचं मनोबल वाढवत विश्वास व्यक्त केला आणि त्यानंतर विल जॅक्सनं पहिला सिक्स मारला. यानंतर विल जॅक्सनं चौकार षटकारांची आतिषबाजी केली. विल जॅक्सनं 10 षटकार आणि 5 चौकार मारले.
विल जॅक्सनं अर्धशतकाचा टप्पा 31 बॉलमध्ये पूर्ण केला होता. यानंतरचा शतकापर्यंतचा टप्पा जॅक्सनं 10 बॉलमध्ये पूर्ण केला. जॅक्सनं या द्वारे ख्रिस गेलच्या नावावर असलेला एक विक्रम मोडला आहे. ख्रिस गेलनं 50 धावा केल्यानंतर शतकापर्यंतचा धावांचा टप्पा गाठण्यासाठी 13 बॉल खेळले होते. यानंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो. विराट कोहलीनं 14 बॉलमध्ये 50 ते 100 धावांचा टप्पा पार केला होता. म्हणजेच विल जॅक्सनं एक प्रकारे ख्रिस गेल आणि विराट कोहलीचं रेकॉर्ड मोडलं आहे.
विल जॅक्स फलंदाजीला आला तेव्हा संघर्ष करत होता. मात्र, त्यावेळी मैदानावर असलेल्या विराट कोहलीनं जॅक्सवर विश्वास दाखवला. जॅक्सनं सुरुवातीला 17 बॉलमध्ये 17 धावा केल्या होत्या. यानंतर त्यानं पुढे खेळलेल्या 24 बॉलमध्ये 83 धावा काढल्या. आरसीबीनं मोहित शर्मा आणि राशिद खानच्या 15 व्या आणि 16 व्या ओव्हरमध्ये 29-29 धावा काढल्या. नो बॉलची एक रन सोडली असता आणि विराट कोहलीची एक रन सोडली असता इतर धावा विल जॅक्स यांच्या होत्या.
विल जॅक्सच्या नाबाद 100 आणि विराट कोहलीच्या नाबाद 70 धावांच्या खेळीच्या जोरावर आरसीबीनं गुजरातला 9 विकेटनं पराभूत केलं. आरसीबीनं ही मॅच 16 व्या ओव्हरमध्येच संपवली.
संबंधित बातम्या:
Sakshi Dhoni :साक्षीची चेन्नईच्या टीमला खास विनंती, म्हणाली मॅच लवकर संपवा 'बेबी आने वाला है...'