Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटनं फलंदाजांवर कारवाई करावी, आठव्या पराभवानंतर सेहवाग भडकला
Hardik Pandya : यंदाच्या आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्सच्या पराभवाची मालिका सुरु आहे. मुंबई इंडियन्सचा काल आठवा पराभव झाला.
मुंबई : मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आयपीएलमध्ये (IPL 2024) काल झालेल्या मॅचमध्ये वानखेडे स्टेडियमवर आणखी एका पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएलमधील आठवा पराभव झाला. कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमधील आव्हान जवळपास संपुष्ठात आल्यात जमा आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा 24 धावांनी पराभव झाला. मुंबईनं यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 11 पैकी 8 मॅचमध्ये पराभव झाला आहे. मुंबईनं केवळ 3 मॅचमध्ये विजय मिळवला. मुंबई इंडियन्सची टीम आणि कॅप्टन हार्दिक पांड्याला या खराब कामगिरीमुळं टीकेला सामोरं जावं लागत आहे. मुंबईच्या कोलकाताविरुद्धच्या पराभवाला टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानं फलंदाजांना जबाबदार धरलं आहे. मुंबई इंडियन्सनं फलंदाजांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचं सेहवागनं म्हटलं.
सूर्यकुमार यादव सोडून मुंबईचे इतर खेळाडू अयशस्वी (Surya Kumar Yadav)
कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 169 धावा केल्या होत्या. कोलकाताच्या फलंदाजांनी 5 बाद 57 वरुन 169 धावांपर्यंत मजल मारली होती. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरनं चागंली फलंदाजी केली. दुसरीकडे कोलकातानं दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या मुंबईची सुरुवात देखील निराशाजनक झाली. मुंबईकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन चांगली सुरुवात करु शकले नाहीत. मुंबईला सुनील नरेननं धक्के दिले. सूर्यकुमार यादवनं 30 बॉलमध्ये 56 धावांची खेळी केली. त्याशिवाय मुंबईचे दुसरे फलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. याशिवाय हार्दिक पांड्या कोलकाताविरुद्ध सातव्या तर टीम डेव्हिड आठव्या स्थानावर फलंदाजीला आला. त्यामुळं देखील मुंबईच्य फलंदाजीच्या क्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
विरेंद्र सेहवागकडून मुंबईच्या फलंदाजांवर प्रश्नचिन्ह (Virender Sehwag)
कोलकातानं आंद्रे रसेलला राखून ठेवलं होतं, त्यानं केवळ 2 बॉलचा सामना केला. टीम डेव्हिड आणि हार्दिक पांड्या उशिरानं फलंदाजीला आल्यावर कशाप्रकारचा निकाल अपेक्षित आहे. ते दोघे जेव्हा फलंदाजीला आले होते त्यावेळी कमी बॉल राहिले होते त्यानंतर दोघेही बाद झाले. तुम्ही जर लवकर फलंदाजीला आलात तर मॅच लवकर संपवू शकता, असं विरेंद्र सेहवाग म्हणाला.
हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सकडून खेळत असताना तो चौथ्या स्थानावर फलंदाजी करत होता. आता काय घडलंय, महत्त्वाचे खेळाडू आता उशिरानं फलंदाजीला का येत आहेत, हे न समजण्यासारखं आहे, असं सेहवाग म्हणाला.
तुम्ही जर 2025 चा विचार करत असाल तर तुम्हाला कोणता खेळाडू आता कोणत्या स्थानावर फलंदाजीला येईल त्याचा विचार केला पाहिजे. तुम्ही भविष्यातील गोष्टींची आता कल्पना कशी करु शकता. तुम्ही जर प्लेऑफसाठी पात्र ठरणार असता तर तुम्ही रिस्क घायला हवी होती, असं सेहवाग म्हणाला.
हे खूप अनाकलनीय आहे. मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटनं खेळाडूंना जाब विचारला पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असं सेहवाग म्हणाला. खेळाडूंनी देखील त्यांनी वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी का केली याचं स्पष्टीकरण द्यायला हवं. मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफ, बॅटिंग कोच, बॉलिंग कोच आणि कॅप्टनची चुकी आहे. संघमालकांनी यांना कठोर प्रश्न विचारावेत, असं सेहवाग म्हणाला.
संबंधित बातम्या :