Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Guillain Barre Syndrome: गेल्या दोन दिवसात संख्या दुपटीने वाढली आहे. या भागातील पाण्याचे नमुने महापालिकेकडून तपासले जात आहेत
Pune: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) या दुर्मिळ आजाराचा धोका वाढताना दिसतोय. गेल्या दोन दिवसात 22 वर असणारी रुग्णांची संख्या आता थेट 59 वर पोहोचली आहे. यात 38 पुरुष तर 21 महिलांना या सिंड्रोमची बाधा झाली आहे.12 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यातील विविध हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पुणे महापालिकेकडून ICMRNIVला तपासणीसाठी नमुने पाठवण्यात येत आहेत. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला आहे. दोन दिवसात संख्या दुपटीने वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पुणे महापालिकेचं शीघ्र कृती दल अलर्ट मोडवर आले आहे.
कोणत्या भागात सापडतायत सर्वाधिक रुग्ण?
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम(Guillain Barre Syndrome)च्या रुग्णांची संख्या 22 वरून थेट 59 वर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसात संख्या दुपटीने वाढली आहे. पुण्यातील किरकिटवाडी, सिंहगड रस्ता आणि धायरी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत असून या भागातील पाण्याचे नमुने महापालिकेकडून तपासले जात आहेत. दुर्मिळ आजार असला तरी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांच मत आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो एक लाखांमध्ये एका व्यक्तीला आढळतो अशी माहिती आहे. याबाबत पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे (Dr Nina Borade) यांनी एबीपी माझाशी बोलताना या आजाराबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले,या सगळ्यांचे सॅम्पल्स एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहे. आजार एका कोणत्यातरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो आणि आजाराला सेकंडरी आजार म्हटलं जातं. 12 ते 30 वयोगटाच्या दरम्यान व्यक्तींना हा आजार होतो. हा आजार धोकादायक नसून घाबरून जाण्याचे काही कारण नाही.