IPL Security Breach: आयपीएलच्या सुरक्षेत मोठी चूक, चाहता थेट मैदानात, विराट कोहलीला नमस्कार करुन कडकडून मिठी
IPL Security Breach : बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर काल आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यात मॅच पार पडली. या मॅचमध्ये विराटनं 77 धावा केल्या, यादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला.
बंगळुरु : आयपीएलमध्ये (IPL 2024) काल सहावी मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings ) यांच्यात पार पडली. आरसीबीनं या मॅचमध्ये पंजाबवर चार विकेटनं विजय मिळवला. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि दिनेश कार्तिक यांनी चांगली कामगिरी केली. विराट कोहलीनं 49 बॉलमध्ये 77 धावा केल्या होत्या. मात्र, यामॅचमध्ये आयपीएलच्या सुरक्षा व्यवस्थेवर (IPl Security Breach) प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली आहे.
पंजाब किंग्जनं आरसीबीला 177 धावांचं टार्गेट दिलं होतं. आरसीबीनं 6 विकेट गमावत मॅच जिंकली. विराट कोहली ज्यावेळी बॅटिंग करत होता. त्यावेळी सुरक्षेत एक चूक झाली. एक चाहता आयपीएलची सुरक्षा भेदून अचानक मैदानात घुसला. तो धावत धावत विराट कोहलीच्या जवळ गेला. संबंधित चाहत्यानं विराट कोहलीचे पाय धरले. चाहत्याच्या मागं सुरक्षा दलाचा जवान देखील धावत सुटला. एका जवानांन त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यानं विराट कोहलीला पकडण्याचा प्रयत्न केला.या सर्व प्रकारानंतर दुसरा सिक्युरिटी गार्ड आला आणि दोघांनी त्याला मैदानाबाहेर नेलं.
बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरील सुरक्षा भेदून चाहता थेट विराट कोहलीजवळ पोहोचला. या सर्व प्रकारानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. चाहत्यांनी सुरक्षा भेदण्याची ही आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली घटना नाही.
A fan breached the field and touched Virat Kohli's feet.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 25, 2024
- King Kohli, an icon! ❤️pic.twitter.com/s82xq8sKhW
जानेवारीत ही अशीच घटना
जानेवारी 2024 मध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये अशीच घटना घडली होती. त्यावेळी चाहत्यानं सुरक्षा भेदून मैदानात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यानं विराट कोहलीला मिठी मारली होती. त्यावेळी विराट कोहली फिल्डिंग करत होता. त्या मालिकेत विराट कोहली 14 महिन्यानंतर टी 20 मध्ये पुनरागमन करत होता.
आरसीबीचा पहिला विजय
आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुला पराभव स्वीकारावा लागला होता. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर काल झालेल्या मॅचमध्ये अखेर आरसीबीनं पहिला विजय मिळवला आहे. आरसीबीनं पंजाब किंग्जला चार विकेटनं पराभूत केलं. आरसीबीनं प्रथम टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाब किंग्जनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 176 धावा केल्या होत्या. बंगळुरुनं विराट कोहलीच्या 77 आणि दिनेश कार्तिकच्या 28 धावांच्या जोरावर विजय मिळवला.
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अखेर या आयपीएलमध्ये पहिला विजय मिळाला आहे. आरसीबीला आतापर्यंत एकदाही आयपीएलचं विजेतेपद पटकावता आलेलं नाही. आयपीएलच्या विजेतेपदाचा दुष्काळ यंदा तरी संपणार का हे पाहावं लागेल.
संबंधित बातम्या :
CSK vs GT : ऋतुराज अन् शुभमन आमने सामने; कशी असेल प्लेइंग इलेव्हन, चेन्नई की गुजरात कोण बाजी मारणार?