(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shubman Gill : शुभमन गिलनं मोडला बाबर आझमचा विक्रम, 'ही' ऐतिहासिक कामगिरी करणारा युवा खेळाडू
Shubman Gill Century : शुभमन गिलने आरसीबी विरुद्धच्या सामन्यात दमदार शतकी खेळी करत बाबर आझमचा विक्रम मोडला आहे.
RCB vs GT, Shubman Gill in IPL : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये आरसीबी (RCB) विरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill) दमदार शतक ठोकत गुजरात (GT) संघाला विजय मिळवून दिला. गुजरात टायटन्सने (GT) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या पराभवासह आरसीबी संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. या विजयी खेळीसह शुभमनने पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमला मागे टाकलं आहे. त्या टी20 क्रिकेटमधील बाबर आझमच्या नावावरील विक्रम मोडीत काढला आहे.
शुभमन गिलनं मोडला बाबर आझमचा विक्रम
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सला काही खास सुरुवात करता आली नाही. गुजरातचा सलामीवीर रिद्धिमान साहा केवळ 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र यानंतर शुभमन गिलने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. शुभमनने उत्तम फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 52 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकार ठोकत 104 धावा केल्या. गिलने या दमदार खेळीसह टी-20 क्रिकेटमधील 25 वेळा 50 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. शुभमन गिल टी20 क्रिकेटच्या इतिहासात 25 वेळा पन्नासहून अधिक धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे.
'ही' ऐतिहासिक कामगिरी करणारा युवा खेळाडू
गुजरात टायटन्सकडून या सामन्यात शुभमन गिलने शानदार शतक झळकावलं. आरसीबीकडून विराट कोहलीनं शतकी खेळी करत गुजरातला विजयासाठी 198 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण शुभमन गिलच्या स्फोटक खेळीमुळे कोहलीची शतकी खेळी व्यर्थ गेली. शुभमन गिलने स्फोटक फलंदाजी करत सर्वांची मनं जिंकली. या सामन्यात शुभमन गिलनं शतक झळकावून बाबर आझमला मागे टाकत त्याचा विक्रम मोडीत काढला आहे. याआधी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 हून अधिक दावा करण्याचा विक्रम बाबर आझमच्या नावे होता. आता शुभमनने नवा विक्रम नोंदवला आहे.
टी 20 क्रिकेटमध्ये 25 वेळा 50 हून अधिक धावा करणार युवा खेळाडू :
- शुभमन गिल : 23 वर्ष 255 दिवस
- अहमद शहजाद : 24 वर्ष 75 दिवस
- बाबर आजम : 24 वर्ष 135 दिवस
- ग्लेन फिलिप्स : 24 वर्ष 208 दिवस
- इशान किशन : 24 वर्ष 272 दिवस
आणखी एक विक्रम शुभमन गिलच्या नावे
आरसीबी विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिलने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 101 धावांची खेळी केली होती. आयपीएलच्या इतिहासात सलग दोन शतकं झळकावणारा शुभमन गिल चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी विराट कोहली, शिखर धवन आणि जोस बटलर यांनी ही कामगिरी केली आहे.
आयपीएलमध्ये सलग दोन शतकं झळकवणारे खेळाडू
- शुभमन गिल : आयपीएल 2023
- विराट कोहली : आयपीएल 2023
- जोस बटलर : आयपीएल 2022
- शिखर धवन : आयपीएल 2020